वीज बळकटीकरणाचा व्यापक आराखडा तयार करा

-महापारेशनला पालकमंत्र्यांचे आदेश

-बैठकीत घेतला कामकाजाचा आढावा
अमरावती / 27 जून: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2034 पर्यंतच्या जिल्हा विकास व्हिजनच्या अनुषंगाने महापारेषणने अमरावती जिल्ह्यासाठी वीज बळकटीकरणाचा व्यापक विकास आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील वाढत्या ऊर्जा गरजांमुळे आणि सौर ऊर्जेचा झपाट्याने वाढणारा प्रवाह लक्षात घेऊन हा आराखडा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महापारेषण कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापारेषण आणि महावितरणची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रताप अडसड, राजेश वानखडे, प्रविण तायडे, उमेश यावलकर, प्रविण पोटे-पाटील यांच्यासह महापारेषण मुख्य अभियंता जयंत विके, महावितरण मुख्य अभियंता अशोक साळुंके, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, प्रणोती देशमुख, प्रमोद पखाले, सागर जारे तसेच सर्व विभागीय कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यात वीज क्षेत्राच्या मजबुतीकरणासाठी 2034 च्या अनुषंगाने तयार करण्यात येत असलेल्या आराखड्यात प्रामुख्याने नवीन 220 केव्हीचे उपकेंद्र, 400 केव्ही व 220 केव्ही वीज वाहिन्यांचे जाळे, तसेच ‘रिंग मेन’ संरचना उभारण्याचा समावेश करण्यात यावा. यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम, सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह होईल. विशेषतः मेळघाटातील दुर्गम भागांचाही या विकास आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश यावेळी दिले.
महापारेषण कंपनीने जिल्ह्यात सुरु असलेल्या 431 कोटी रुपयांच्या प्रगतीपथावरील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. अचूकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी वीज वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्ती आणि सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले. बावनकुळे पुढे म्हणाले, महावितरणने लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घ्यावे. ‘लोकाभिमुख सरकार’ निर्माण करण्यासाठी महावितरणचा पुढाकार असावा. या पार्श्वभूमीवर, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांनी महिन्यातून किमान चार वेळा एखाद्या गावांमध्ये भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधावा, अशा सूचना दिल्या.
याशिवाय, वारंवार वीज खंडित होणार्‍या समस्यांवर मूळ कारणांचा शोध घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी प्रत्येक महिन्याला स्थानिक आमदारांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेवून त्यांचे निराकरण करावे. तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कामाचे नियोजन करावे, असेही सांगितले. अधीक्षक अभियंता यांनी तक्रारींवर तातडीने कारवाई करून त्यांचे निवारण करावे. आस्थापनांमध्ये नियुक्त कर्मचार्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास राहून ग्राहकांना समाधानकारक सेवा द्यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
ऊर्जा क्षेत्रातील या सर्वसमावेशक पायाभूत विकास आराखड्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वीज व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सक्षम महाराष्ट्र या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार येणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button