1 जानेवारी 2026 पासून वेतनवाढीची तयारी

8 वा वेतन आयोग लागू होणार?

-सरकारी कर्मचार्‍यांमध्ये आनंदाची लाट
मुंबई / 8 सप्टेंबर : सरकारी नोकरदारांच्या प्रतीक्षेचा दिवस जवळ येतो आहे. केंद्र सरकारने 8 वा वेतन आयोग लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. अद्याप अधिकृत अधिसूचना जारी झाली नसली तरी, आगामी वर्षाच्या पहिल्या तारखेपासून हा आयोग लागू होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि पेन्शनधारक पेन्शन व वेतनात भरघोस वाढ अनुभवणार आहेत. सध्या देशात 48 लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 67 लाखांपेक्षा जास्त निवृत्ती वेतनधारक आहेत, ज्यांना या आयोगाचा थेट लाभ होणार आहे. यापूर्वी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता. आता 10 वर्षांनी आठवा वेतन आयोग लागू होणार असून, यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडण्याची शक्यता आहे. वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर या गुणकाच्या आधारे वेतनवाढ निश्चित करण्याची योजना आखली आहे. यंदा फिटमेंट फॅक्टर 2.28 वरून 3.00 करण्याची शक्यता आहे. या प्रमाणात वाढ झाल्यास किमान वेतन 18,000 रुपयांवरून 21,600 रुपये होऊ शकते.
एका कर्मचार्‍याचे मासिक वेतन 34.1 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. किमान पेन्शन 20,500 रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे कर्मचार्‍यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये दरवर्षी जानेवारी व जुलै या दोन वेळा वाढ होते. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए दर 55 टक्के आहे, जो 2026 पर्यंत 70 टक्के होऊ शकतो. महागाई भत्त्याचा दर फिटमेंट फॅक्टरमध्ये समाविष्ट असल्यामुळे बेसिक सॅलरी वाढीमुळे एकूण पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.
आठव्या वेतन आयोगाची स्थापना आधीच झाली आहे, मात्र आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य अजून निवडलेले नाहीत. सरकारने विविध मंत्रालयांकडून आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांकडून माहिती गोळा केली आहे. त्यामुळे लवकरच योग्य शिफारशी जाहीर होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचार्‍यांचे मासिक वेतन आणि पेन्शन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. फिटमेंट फॅक्टर 3.00 होण्याची शक्यता असून, महागाई भत्त्याचा प्रभाव यामध्ये समाविष्ट असल्याने संपूर्ण वेतनवाढ 30-35 टक्क्यांपर्यंत होऊ शकते.

संबंधित बातम्या

Back to top button