जालन्याला हवालामार्गे जाणारे 1 कोटी 45 लाख पोलिसांनीच लुटले
मध्य प्रदेशातील उपविभागीय अधिकार्यासह 10 पोलीस निलंबित

* वरिष्ठ पोलिस अधिकार्याकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
भोपाळ /13 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातून जालन्याला पाठवली जाणारी तब्बल 1.45 कोटी रुपयांची हवालाची रक्कम लुटल्याप्रकरणी सिवनी जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीओपी) पूजा पांडे यांच्यासह दहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी ही रक्कम जप्त न करता आपापसांत वाटून घेतल्याच्या धक्कादायक प्रकाराची मध्य प्रदेश सरकारने गंभीर दखल घेतली आहे. ही घटना बुधवार, 8 ऑक्टोबरच्या रात्री घडली. कटनी येथून जालन्याकडे जाणाऱ्या क्रेटा कारमध्ये (एमएच 13/इके 3430) तीन कोटी रुपये रोख रक्कम जात असल्याची माहिती सिवनी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर एसडीओपी पूजा पांडे यांनी बंडोल पोलिस ठाण्याशी संपर्क साधून गाडी अडवण्याचे आदेश दिले. रात्री सुमारास पोलिसांनी कार थांबवून चालकाला दमदाटी केली आणि कारमधील रोकड आपल्या गाडीत टाकली. पुढील दिवशी, 9 ऑक्टोबर रोजी हवाला व्यापारी सोहन परमार यांनी पूजा पांडे यांची भेट घेतली आणि तडजोडीनंतर दीड कोटी रुपये परत करण्याचे ठरले. मात्र, रक्कम परत मिळाल्यानंतर परमार यांनी मोजणी केली असता 25 ते 30 लाख रुपये कमी असल्याचे आढळले. संतप्त परमार यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत गोंधळ घातला, त्याच वेळी आणखी एक व्यापारीही त्यांच्यासोबत होता. स्थानिक पत्रकारांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात पोहोचून हा खरा प्रकार उघड केला. या घटनेनंतर पोलिस महानिरीक्षक (जबलपूर) प्रमोद वर्मा यांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्यांच्या अहवालाच्या आधारे मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक कैलाश मकवाना यांनी एसडीओपी पूजा पांडे यांना निलंबित केले. सिवनीचे पोलिस अधीक्षक सुनील कुमार मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान बंडोल पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि एसडीओपी कार्यालयातील काही कर्मचारी यांना सिलादेही जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात रोकडसह एक कार सापडली होती. मात्र, त्यांनी ती रक्कम जप्त करण्याऐवजी चालकाला मारहाण करून पळवून लावले आणि पैसे हडप करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देता रक्कम दडपून ठेवण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास जबलपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 1 कोटी 45 लाख रुपये जप्त केले असून, ही रक्कम जालन्यात कोणाकडे पाठवली जात होती, याचा तपास सुरू आहे. निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये बंडोल पोलिस ठाण्याचे प्रभारी उपनिरीक्षक अर्पित भैराम, हेड कॉन्स्टेबल मखन आणि रवींद्र उईके, कॉन्स्टेबल जगदीश यादव, योगेंद्र चौरसिया, चालक रितेश, नीरज राजपूत, केदार आणि सदाफल यांचा समावेश आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी मादक द्रव्यांची तस्करी होत असल्याच्या संशयावरून कारवाई केल्याचा दावा केला असला, तरी तपासात अनियमितता स्पष्ट झाल्याने संबंधित पोलिसांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या लूट प्रकरणाचा तपास सध्या जबलपूर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.




