13 रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई/4 डिसेंबर – महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने 5 डिसेंबर ते 07 डिसेंबर या कालावधीत 13 प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी अपेक्षित असल्याने मध्य रेल्वेने 13 प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.
मध्य रेल्वेने या उपाययोजनेचा उद्देश प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रणात ठेवणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची हालचाल सुरळीत व्हावी, असे जाहीर केले आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरील निर्बंध असलेल्या स्थानकांची नावे रेल्वेने जाहीर केली आहे. मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर स्थानकांवर 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान निर्बंध लागू राहतील. भुसावळ विभागातील भुसावळ, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, अकोला, शेगाव, पाचोरा, बडनेरा, मलकापूर आणि चाळीसगाव या स्थानकांवर 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर रोजी निर्बंध लागू राहतील. नागपूर विभागातील नागपूर स्थानकावर 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर रोजी निर्बंध लागू राहतील. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, बालक, निरक्षर प्रवासी तसेच एकट्याने प्रवास करू न शकणार्‍या महिला प्रवासी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींना प्रवास सुलभ राहावा म्हणून या निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासाची योग्य प्रकारे आखणी करून या नवीन नियमांचे पालन करावे, ज्यामुळे प्रवास सुरळीत व सुरक्षित होईल.

संबंधित बातम्या

Back to top button