पिकअप गाडी खोल दरीत कोसळली; 9 भाविकांचा मृत्यू

11 जणांची प्रकृती चिंताजनक

* दिवाळीत सातपुडा परिसरात पसरली शोककळा

* 22 हून अधिक जखमी

मुंबई/18 ऑक्टोबर – नंदुरबार येथे धार्मिक यात्रेहून परतणार्‍या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. परिसरात शोककळा पसरली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. २२ हून अधिक गंभीर जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले असून त्यातील ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवले आहे. घाटातील तीव्र वळणावरून वाहन सुमारे १०० फूट खाली कोसळल्याने मागच्या भागातील लोक खाली दबले गेले आणि अनेकांना जबर मार लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथक घटनास्थळी धावले.

धनत्रयोदशी निमित्त नंदुरबार जिल्ह्यातील अस्तंबा पर्वतावर होणाऱ्या यात्रेहून परतणाऱ्या खासगी मालवाहू वाहनाचा अपघात शनिवारी झाला. भारतात एशत्थामाचे स्थान कुठेही नमूद नसले तरी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा रांगेत सुमारे ४,००० फूट उंचीवर अस्तंबा ऋषी नावाने त्याचे स्थान आहे. शापस्थ अवस्थेतील जखमी एशत्थामा दर्‍याखोर्‍यात तेल मागतो आणि रस्ताहीन झालेल्या यात्रेकरुला मार्गदर्शन करतो, अशी दंतकथा आहे. या कारणास्तव दरवर्षी धनत्रयोदशीपासून दोन दिवस हजारो भाविक अस्तंबा यात्रेसाठी मार्गस्थ होतात. शूलपाणीच्या झाडीमधल्या डोंगरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक शिखरावर पोहोचतात, शिळा पूजतात आणि परतीच्या मार्गावर जातात.

यात्रा तळोदा शहरातून कोठार-देवनदी-असली-नकट्यादेव-जुना अस्तंबा-भीमकुंड्या या मार्गाने सुरू होते. जंगली शापदांना दूर ठेवण्यासाठी ढोल, आगीसाठी टायर, दिवट्या, टेंभे, मशाली अशा दीर्घ काळ जळणार्‍या वस्तू घेतल्या जातात. रात्रीचा प्रवास करून शिखरावर पोहोचल्यावर भाविक धनत्रयोदशीला पहाटेच्या सुमारास दर्शन घेत ध्वज लावतात. या ठिकाणी डोंगरावर येणारी रोषा ही वनस्पती तोडून बरोबर घेतली जाते, तसेच आदिवासी बांधव तळोदा येथे एकत्र येऊन ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढतात.

शनिवारी पहाटे यात्रा सुरू असताना वाहन नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात पोहोचले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यात सुमारे ४० भाविक होते आणि अनेकजण वाहनाखाली दबले. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले असून काही जखमी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. मयत आणि जखमींपैकी अनेक जण नंदुरबार जिल्ह्यातील भुराटी आणि शहादा तालुक्यातील वैजाली येथील रहिवासी आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा पुढील काही तासांत वाढण्याची शक्यता आहे.

 

संबंधित बातम्या

Back to top button