अपघातात जखमी परिचारिकेचा उपचारादरम्यान मृत्यु

-महामार्गावर ट्रकने दिली होती धडक

अमरावती / 24 जुलै: अमरावती-नागपूर महामार्गावर नांदगाव पेठनजीक 19 जुलै रोजी ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात जखमी परिचारिकेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. मयुरी दिगंबर धोटे (38, मुगलाई, परतवाडा) असे मृतक महिलेचे नाव आहे.
19 जुलै रोजी मयुरी धोटे या आपल्या दिनेश गोपाल चंडाले (45, हबीब नगर, वलगाव रोड) नामक सहकारी कर्मचार्‍यासह दुचाकीने नांदगाव पेठ येथे प्लाट पाहण्यासाठी गेल्या होत्या. बाम आटोपल्यानंतर दोघेही एमएच 32 / यू 0049 क्रमांकाच्या दुचाकीने नांदगाव पेठ येथून अमरावतीला परत येण्यासाठी निघाले. वाटेत महामार्गावर टोल नाक्यानजीक मागून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी नियंत्रित होवून दोघेही रस्त्यावर पडले. अपघातात मयुरी धोटे आणि दिनेश चंडाले या दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी अमरावती सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
मयुरी धोटे यांच्या डोक्याला मार लागून नाक व कानातून रक्तस्त्राव झाला तर दिनेशच्या हाता-पायांना मार बसला. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक पसार झाला. मयुरी धोटे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास उपचादादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध सुरु केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button