मुंबईत राष्ट्रवादीची अमरावतीवर विशेष चर्चा

महापालिका निवडणुकीवर मंथन; नगरपंचायतीवरही घेतला आढावा

अमरावती/ 7 नोव्हेंबर – आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमरावतीसाठी स्वतंत्र रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमरावती जिल्हा युनिटची सद्यस्थिती, निवडणूक तयारी आणि संभाव्य युतीचे पर्याय यांचा सखोल आढावा घेतला. बैठकीला आमदार संजय खोडके, रूपाली चाकणकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, आमदार सुलभा खोडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे, शहराध्यक्ष प्रशांत डावरे, अविनाश मार्डीकर आणि प्रभागनिहाय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक पदाधिकार्‍यांनी अमरावतीतील पक्षाची संघटन रचना, प्रभागनिहाय ताकद आणि उमेदवारी इच्छुकांची माहिती वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली.युती झाल्यास परिस्थिती कशी बदलेल – वरिष्ठांचा तपशीलवार आढावा. भाजप-शिंदे सेना युती झाल्यास अमरावतीतील मतांचे चित्र कसे बदलेल, राष्ट्रवादीची स्वतंत्र ताकद किती ठरेल आणि कोणत्या प्रभागात पक्ष मजबूत उभा राहू शकतो, याचा अजित पवार आणि तटकरे यांनी स्वतंत्र विश्लेषण केले. मागील निवडणुकीत चिखलदरा, मोर्शी आणि धारणी नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता होती. यावेळी आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले. अजित पवारांकडून निधी तसेच पक्षाला श्रेय मिळवण्याचे आदेश. राज्याच्या तिजोरीचे प्रमुख म्हणून अजित पवार यांनी अमरावतीतील विविध विकास प्रकल्पांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या प्रकल्पांचे श्रेय स्थानिक पातळीवर पक्षाकडे जाईल याची खात्री करण्यासाठी पदाधिकार्‍यांनी आक्रमकपणे काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. महापौर निवडणुका थेट जनतेतून होत असल्याने राष्ट्रवादीतून जास्तीत जास्त बलाढ्य महापौरपदाचे उमेदवार उभे करावेत, असेही त्यांनी अधोरेखित केले.
मुंबईत दोन दिवसांपासून अमरावतीचे वर्चस्व-महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर अमरावतीतील शेकडो पदाधिकारी सलग दोन दिवस मुंबईत उपस्थित राहून निवडणूक तयारीसाठी वरिष्ठांशी संवाद साधत आहेत. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने बैठकीचे महत्त्व आणखी वाढले आहे.
ग्रामीण भागातूनही मोठी उपस्थिती-किशोर शेळके, रतन देंडुळे, प्रशांत डावरे, जितू ठाकूर, मनोज केवले यांच्यासह ग्रामीण व शहरी भागातील अनेक महिला आणि ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून अमरावतीतील राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली. अमरावतीतील निवडणूक रंगत वाढवणारी आणि राष्ट्रवादीच्या रणनितीला धार देणारी ही बैठक विशेष ठरली.

संबंधित बातम्या

Back to top button