खासदार भुमरेंचा चालक बनला 150 कोटींच्या जमिनीचा मालक
हैद्राबादच्या कुटुंबाने दिली भेट

-आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी
छत्रपती संभाजीनगर / 27 जून : खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरकडे जवळपास 150 कोटींची किंमत असलेली जमीन असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले आहे. संदीपान भुमारे हे शिंदे गटाचे खासदार आहेत. तर त्यांचे सुपुत्र विलास भुमरे हे पैठणचे आमदार आहेत. जावेद रसुल नामक व्यक्ती हे मागील अनेक वर्षांपासून त्यांचे ड्रायव्हर आहेत. हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबाच्या वंशजाने जावेद रसुलला ही जमीन भेट स्वरुपात दिली. ही मालमत्ता ‘हिबानामा’ करुन दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. ही मालमत्ता भेट म्हणून जावेद रसुलला मिळाली, त्याची अंदाजे किंमत 150 कोटी आहे. या प्रकरणी परभणी येथील एका वकीलाने तक्रार केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या जमिनीची चौकशी सुरू केली असून या प्रकरणी संदीपान भुमरे व विलास भुमरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबातील वंशजाने जालना रोड येथील उच्चभ्रु वसाहतीतील दाऊदपुरा येथील तीन एकर जमीन भुमरेंचे ड्रायव्हर जावेद रसुल यांना भेट म्हणून दिली आहे. या जमिनीची सध्याची किंमत 150 कोटींच्या आसपास आहे. मागील 13 वर्षांपासून जावेद रसुल हे भुमरे कुटुंबाचे चालक म्हणून काम करत आहेत. आमदार विलास भुमरे यांनी या प्रकरणी सांगितले की, ड्रायव्हरच्या वैयक्तिक आयुष्याशी आपला काहीही संबंध नाही, हिबानामा ही मालमत्ता भेट देण्याची कायदेशीररित्या वैध प्रक्रिया आहे. या प्रकरणी चौकशीसाठी मला आणि वडिलांना पोलिसांनी माहितीसाठी बोलावले आहे. त्यामुळे आता सालारजंग कुटुंबातील वंशजाने ही तीन एकर जमीन हिबानामा (भेट) म्हणून दिल्यानंतर या व्यवहारावर परभणीच्या एका वकिलाला संशय आल्याने त्यांनी याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
तर, या प्रकरणी चालक जावेद रसुल यांनी सांगितले की, मी तपासाला सहकार्य करत आहे. हैदराबाद येथील सालारजंग वंशजांशी माझे जवळचे संबंध आहे. सालारजंग कुटुंबातील अनेक सदस्यांनी हैदराबादच्या पूर्वीच्या निजामाचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे. तसेच, मजहर अली आणि इतर सहा जणांनी केलेल्या भेटवस्तूच्या कागदपत्रात असे म्हटले आहे की, त्यांना 30 जानेवारी 2023 पर्यंत चाललेल्या प्रदीर्घ खटल्यानंतर दाऊदपुरा येथील बाग शेरगंज येथील कुळाच्या 12 एकरपैकी तीन एकर जमिनीचा वाटा मिळाला. तीच जमीन भेट म्हणून जावेद रसुलला दिली गेली आहे.
परंतु, परभणी येथील तक्रारदार वकील मुजाहिद खान म्हणाले की, जावेद हा सालारजंग कुळाशी फारसा संबंधित नव्हता. या वस्तूस्थितीमुळे उत्सुकता वाढली. हाबानामा कायदेशिररित्या फक्त रक्ताच्या नातेवाईकांमध्येच वैध आहे. जावेद आणि सालारजंग वंशजांचा काय संबंध हे चौकशीत समोर येईल. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले की, करारावर स्वाक्षरी करणारे सालारजंग कुटुंबातील सदस्य मीर मजहर अली खान आणि सहा नातेवाईकांनी त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी नोटीशीला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. तर त्यांचे फोन सुद्धा बंद आहेत. त्यामुळे आता पोलिसांकडून जावेद रसुलच्या उत्पन्नाच्या स्रोताची चौकशी केली जात आहे.




