सर्वत्र मोसमी वारे, पुढील पाच दिवस पावसाचे

देशात सर्वदूर पावसासाठी अनुकूल वातावरण

-विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह हजेरी
मुंबई / 29 जून: नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांनी रविवारी, 29 जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे 8 जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस अगोदरच मोसमी वार्‍यांनी संपूर्ण देश व्यापला आहे. देशात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण असून, पुढील पाच दिवस देशाच्या बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजित वेळेनुसार, साधारणपणे 8 जुलै रोजी नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस अगोदर 29 जून रोजीच मोसमी वार्‍यांनी सर्व देश व्यापला आहे. एक जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा लवकर 24 मे रोजी दाखल झाला. त्यानंतर 25 मे रोजी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला. लगेच दुसर्‍या दिवशी मोसमी वार्‍यांनी आगेकूच सुरू केली. मुंबईसह, पुणे आणि इतर काही भागात 26 मेपासून धडक दिली आणि 17 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. यंदा केरळमध्ये वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. अंदाजित वेळेपेक्षा 8 दिवस अगोदर आणि मागील 16 वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे लवकर दाखल झाले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी तळकोकणात मोसमी पावसाचे आगमन झाले आणि लगेचच सोमवारी मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
यंदा 15 दिवस अगोदरच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. सामान्यतः मुंबईत पावसाळा 10 जूननंतर सुरू होते. दरम्यान, यंदा मोसमी पाऊस सर्वसाधारण तारखेच्या 9 दिवस आधी निकोबारमध्ये, 8 दिवस आधी केरळमध्ये आणि 13 दिवस आधी महाराष्ट्रात दाखल झाला. एक जूनपासून देशभरात सरासरीपेक्षा 9 टक्के तर, राज्यात 10 टक्के जास्त पाऊस झाला आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button