अमरावतीचा कायापालट करण्यासाठी आ.सुलभा खोडके यांची विधानसभेत जोरदार फलंदाजी

अमरावतीच्या विकासासाठी खजिन्याचे दार उघडा

प्रशासकीय कोंडी फोडून वडाळीला जागतिक ओळख देण्याचा संकल्प

मुंबई/12 मार्च : अमरावती शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करून नागरिकांना आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा सुविधांचा लाभ मिळावा यासाठी 2026-27 च्या अर्थसंकल्पातून भरघोस निधी देण्याची आग्रही मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी विधानसभेत केली. वडाळी परिसराचा निसर्गरम्य विकास, स्वतंत्र शहर तहसील कार्यालयाची निर्मिती, बिबट्यांपासून संरक्षण, क्रीडा संकुलांच्या निधीत वाढ आणि शाळांच्या दुरूस्तीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद अशा विविध जनहितार्थ मुद्द्यांकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधून अमरावतीच्या प्रगतीचा नवा आराखडाच सभागृहात मांडला.
अमरावती शहर आज वेगाने वाढत आहे, मात्र प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत असल्याने त्यांनी अमरावती तहसील कार्यालयाचे दोन भागात विभाजन करण्याची मागणी केली. वडाळी येथील तलाव आणि बांबू उद्यानाचा एकत्रित विकास करून तिथे पर्यावरण पूरक पर्यटनाला वाव दिल्यास शहराच्या वैभवात भर पडेल. शहरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनक्षेत्राला लोखंडी कुंपण लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. विभागीय क्रीडा संकुलाचा दर्जा उंचावण्यासाठी 50 कोटींचा निधी 75 कोटींपर्यंत वाढवावा आणि जिल्हा क्रीडा संकुलाला 50 कोटी रुपये द्यावेत, जेणेकरून खेळाडूंना उत्तम सराव करता येईल. महानगरपालिकेच्या जुन्या शाळांची दुरूस्ती करून तिथे संगणक प्रयोगशाळा, विज्ञान केंद्र आणि डिजिटल वर्गखोल्या उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती त्यांनी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रस्तावित जागा शहरापासून खूप लांब असल्याने, रुग्णांच्या सोयीसाठी नागपूर महामार्गालगतच्या जागेचा गांभीर्याने फेरविचार करावा आणि विदर्भाचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास महामंडळाचा केंद्राकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव तातडीने मंजूर करून घ्यावा, अशी आग्रही भूमिका आमदार सुलभा खोडके यांनी मांडली.

विशेष लक्षवेधी; शिक्षण आणि आरोग्याचा नवा ध्यास

महानगरपालिकेच्या 63 शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने तिथे नवीन वर्गखोल्या आणि आधुनिक सुविधांची गरज आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय शहराच्या जवळ असल्यास गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील. या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अमरावतीकरांना दिलासा द्यावा, ही मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी लावून धरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button