अजितदादांच्या खात्यावर शिंदेंचे मंत्री वॉच ठेवणार

-शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला

-निधीवाटपावरुन शिंदेंचे मंत्र्यांना आदेश
मुंबई / 24 जून: महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरू झालेला संघर्ष थांबायचं नाव घेताना दिसून येत नाही. निधीवाटपावरुन सुरु असलेला हा संघर्ष दिवसेंदिवस हा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा याचा प्रत्यय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पाहायला मिळाला. शिवसेना मंत्र्यांसोबत झालेल्या या विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थखात्यावरुन महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची मंगळवारी (ता.24) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्गासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही शिवसेना मंत्र्यांची वेगळी बैठक झाली. या बैठकीत शिंदेंनी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. मात्र, शिवसेनेच्या या बैठकीत सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधातील तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती आहे. यावेळी शिंदेंनी नाराजीचा सूर आळवलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना महत्त्वाचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे. यामुळे अजितदादांच्या खात्यावर शिवसेना मंत्री वॉच ठेवणार आहे.
एकनाथ शिंदेंनी आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या खात्याकडे 14-14 हजारांचे दोन मोठे निधी असून त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, अशा सूचना दिल्याची चर्चा आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्या आधी शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये निधीवाटपावरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. मविआ सरकारमध्ये अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी केल्या होत्या. याच कारणामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी बंड केले होतं. आता पुन्हा एकदा तोच नाराजीचा सूर महायुती सरकारमध्येही आळवला आहे. यावरुन शिवसेनेची नाराजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button