मराठा मुलींचे लग्न आमच्या मुलांशी लावा

लक्ष्मण हाकेंचे वादग्रस्त विधान

-मराठा समाजात संताप, हाकेवर गुन्हा
गेवराई / 14 सप्टेंबर : गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात प्रा. लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बीड जिल्ह्यात संताप उसळला असून रविवारी (दि.14) गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओबीसी समाजाच्या मेळाव्यात बोलताना हाके यांनी मराठा समाजातील मुलींचे लग्न आमच्या मुलांशी लावा असे विधान केल्याचा आरोप आहे. या विधानाने मराठा समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या असून गेवराईसह जिल्ह्यातील अनेक भागांत समाजबांधवांनी संताप व्यक्त केला आहे.
तलवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर गेवराई शहरातील पोलिस ठाण्यावरही मराठा समाज एकवटला होता. समाजबांधवांनी हाके यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत निवेदन सादर केले. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथे परवानगी न घेता समाजबांधवांना एकत्र करून सभा घेतल्याप्रकरणी हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यात भर म्हणून शृंगारवाडीतील वादग्रस्त विधानानंतर आता मराठा समाजाच्या संतापाचा भडका उडाला आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा मार्ग खुला केल्यानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हाके यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन छेडले असून, त्यातूनच हे विधान झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-जरांगेंकडून खरपूस समाचार
दरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी हाके यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत आमच्या लेकी-बाळींपर्यंत तुमची नजर चालली आहे अशा शब्दांत हाके यांना चपराक दिली. जरांगे यांनी मराठा समाजाला अपमानित करणार्‍यांना समाज माफ करणार नाही, असा इशारा दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, पोलिस प्रशासनावर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button