गेवराईत मराठा-ओबीसी संघर्षाचा स्फोट!
आ. पंडित व हाके समर्थक आमने-सामने

-गाडीवर दगडफेक, घोषणाबाजी, पुतळा दहन
बीड / 25 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेवराईत सोमवारी (25 ऑगस्ट) तणावपूर्ण घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे समर्थक आमने-सामने आल्याने शहरात राडा झाला. या दरम्यान हाकेंच्या गाडीवर दगडफेक व चप्पल फेकून हल्ला करण्यात आली. गेवराई शहरात जरांगे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवरून ठिणगी पडली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाके यांच्या गाडीची पुढील काच फोडण्यात आली. या घटनेमुळे वातावरण तापले असून पोलिसांना मोठ्या संख्येने तैनात व्हावे लागले.
घटनेनंतर आमदार पंडितांनी संतप्त प्रतिक्रिया देत हाके यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, लक्ष्मण हाके हा श्वान आहे. 2024 मध्ये माझ्याविरोधात प्रचार केला, पण ज्याचा प्रचार केला त्याचं डिपॉझिट जप्त झालं. हा रिचार्जवाला डॉग आहे, कोणाच्या इशार्यावरून भुंकतोय हे आम्हाला ठाऊक आहे. पंडित यांच्या वक्तव्यावर हाकेही भडकले. त्यांनी पलटवार करत म्हटलं, आम्ही कुणाच्याही दहशतीला घाबरत नाही. मी 500 किलोमीटरवरून आलो आहे, दम असेल तर बाहेर ये. माझे पुतळे जाळतोस? मलाच जाळ!
दरम्यान, पंडित समर्थकांनी हाके यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून हाके समर्थकही आक्रमक झाले. या संघर्षामुळे गेवराई शहरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.




