मराठा समाजाला आरक्षणाची गरज, पण…
खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत

मुंबई/1 ऑक्टोबर – कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून पुन्हा एकदा लढा सुरू करण्यात आला आहे. ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट, कायद्याची पुस्तके, पेन आणि अन्य गोष्टींचे पूजन करून आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बोलताना शाहू छत्रपती महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसोबत बैठका घेतल्या, मात्र सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, अशी खंत व्यक्त केली. शिवाय, मराठा आरक्षणाचा लढा आपण वेगळ्या वळणावर नेत असून, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, यात शंका नाही, असे शाहू महाराजांनी म्हटले. दिल्लीतील निवासस्थानाबद्दलही खंत व्यक्त करत त्यांनी सांगितले की, खासदार होऊन दीड वर्ष झाले तरी अजूनही कायमस्वरूपी घर मिळालेले नाही. यावेळी बोलताना शाहू महाराजांनी भारतरत्न पुरस्काराबद्दलही भाष्य केले आणि म्हटले की, भारतरत्न पुरस्कार देताना शासनाला नियम ठरवावे लागतील; स्वातंत्र्यानंतर जे हयात आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झाला, त्यांना भारतरत्न देण्यासंदर्भात नियम करायला हवा.




