माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात
सदनिका घोटाळाप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा कायम

* जिल्हा कोर्टाचा निकाल
मुंबई /16 डिसेंबर : बनावट दस्तावेजांद्वारे ‘अल्प उत्पन्न गटा’तून शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना काही महिन्यांपूर्वी दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 50 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे कोकाटे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर टांगती तलावर होती.
पण, न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी दोन वर्षे कारावास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवल्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक शहरातील सर्वात महागड्या आणि उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. तसेच, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धन या तीन जणांनी कॅनडा कॉर्नर भागात व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्या होत्या. परंतु, दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोले यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली. तत्कालीन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी चौकशीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यात माणिकराव कोकाटे यांनी जास्तीचे उत्पन्न असताना ते कमी दाखविल्याचे उघड झाले होते.
याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची न्यायालयाने सुनावली होती. दरम्यान, आता प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना सुनावलेली शिक्षा वरच्या न्यायायलयात कायम ठेवण्यात आली आहे. तसेच शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे कारावास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
* मंत्रिपदासह आमदारकी जाण्याची भीती?
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची शिक्षा झाली तर त्यांना पदावर राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे कायद्यातील नियमाप्रमाणे माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे कारवाई होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




