मालेगाव बॉम्बस्फोट : सर्व आरोपी निर्दोष!

17 वर्षांनी एनआयए कोर्टात निकाल

-साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सात जणांची मुक्तता
-पुराव्यांच्या अभावामुळे सर्वजण दोषमुक्त
मुंबई / 31 जुलै : राज्यभरातील नागरिकांच्या मनात खळबळ उडवणार्‍या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आला आहे. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने आज (31 जुलै) दिलेल्या निकालात, सर्व सात आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. या निकालामुळे या खटल्याच्या सुनावणीचा इतका वर्षांचा प्रवास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, स्वामी अमृतानंद, आणि सुधाकर चतुर्वेदी या सात आरोपींवर दहशतवाद, खुन, कट रचणे, स्फोटके ठेवणे अशा गंभीर आरोपांची नोंद होती. एनआयएने मृत्युदंडाची मागणी करत खटल्यात कडवट भूमिका घेतली होती. परंतु विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी पुरावे सुसंगत व ठोस नसल्यामुळे आरोपींना दोषी ठरवता येत नाही, असा निकाल देत सर्वांनाच निर्दोष ठरवले.
29 सप्टेंबर 2008, रमजानचा महिना आणि नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मालेगावमधील भिक्खू चौकात रात्री 9.35 च्या सुमारास ही बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. याठिकाणी नमाजासाठी जमलेली गर्दी होती आणि तेव्हाच एक प्रचंड स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 101 नागरिक जखमी झाले. तपास सुरू झाल्यानंतर घटनास्थळी सापडलेली मोटरसायकल साध्वी प्रज्ञासिंह यांच्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आणि याप्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा दावा पुढे आला. या स्फोटामागे ‘अभिनव भारत’ या हिंदू संघटनेचा सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. एनआयएच्या तपासात या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांची नावे समोर आली होती. या सात आरोपींविरुद्ध स्फोटके कायदा, शस्त्रास्त्र कायदा, आणि आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणातली प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भाजपच्या माजी खासदार आहेत. त्यांच्यावर आरोप झाल्यापासून देशभरात हा खटला राजकीय चर्चेचा विषय बनला होता. भाजपने यावर नेहमीच भूमिका घेत ती निर्दोष असल्याचे म्हटले होते, तर विरोधकांनी त्यांचा निषेध केला होता. आजच्या निकालानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी न्यायदेवतेचे आभार मानले आहेत. राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. एनआयएच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 2008 मध्ये घटनेनंतर या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे होता. 2011 मध्ये प्रकरण एनआयएकडे वर्ग झाले. 2017 साली साध्वी प्रज्ञा यांना जामीन मिळाला. आज 31 जुलै 2025 रोजी न्यायालयाचा अंतिम निकाल येउन सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. मुंबई सत्र न्यायालय परिसरात निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मुंबई पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची तैनाती करण्यात आली होतीम
-न्यायालयाचा स्पष्ट संदेश
कायद्याच्या राज्यात पुराव्याशिवाय कोणालाही दोषी ठरवता येत नाही. हा न्यायालयाचा निर्णय फौजदारी न्यायव्यवस्थेतील पुराव्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकणारा आहे. आजच्या निकालातून असा संदेश न्यायालयाने दिला आहे. मालेगावसारख्या संवेदनशील घटनांमध्ये पोलिस तपास, तपशीलवार पुरावे, आणि निष्पक्ष सुनावणी हेच न्यायासाठी महत्त्वाचे ठरतात. 17 वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर हा निकाल काहींसाठी न्यायाचा विजय असला, तरी दुसर्‍या बाजूला पीडित कुटुंबांसाठी मात्र हा एक अपूर्ण अध्याय राहून गेला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button