विधान परिषदेच्या 17 पैकी 16 जागांवर महायुती विजयी
नाशिकमध्ये धक्कादायक निकाल

मुंबई/22 जून-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 11 जागांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी 6 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्यामुळे उर्वरित 11 जागांचे निकाल आज जाहीर झाले.
विधान परिषदेच्या या जागांसाठीचं मतदान 18 जून रोजी पार पडलं होतं. एकूण 17 जागांपैकी तब्बल 16 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.तर नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का दिला आहे. भाजपचे बंडखोर असलेले गोकुळ गीते यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला आहे. एकूण 17 जागांपैकी भाजपने 11, शिंदेंच्या शिवसेनेने 4, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला या निवडणुकीत विजय मिळवता आलेला नाही. भाजपने 11 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला 3 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. 17 पैकी 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये रवींद्र फाटक (ठाणे), अनिकेत तटकरे (कोकण), विक्रम काकडे (पुणे), प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर), दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ) आणि अरुण लखानी (वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर) यांचा समावेश होता.तर उर्वरित नाशिक, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, सोलापूर, भंडारा-गोंदिया, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या जागांवर निवडणूक लढवली गेली.
उर्वरित 11 जागांचे निकाल :
छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप)
भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप)
परभणी-हिंगोली – सय्यद खान (शिवसेना)
सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप)
नागपूर – राजीव पोतदार (भाजप)
जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप)
अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)
नांदेड – अमर राजूरकर (भाजप)
नाशिक – गोकुळ गीते (अपक्ष)
एका जागेचा अपवाद वगळता महायुतीने या निवडणुकीत वर्चस्व राखल आहे. दुसर्या बाजूला महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.




