‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राचा उच्चांक

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सन्मान

मुंबई/4 डिसेंबर : ’मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात 45,911 सौर कृषिपंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (5 डिसेंबर 2025) सकाळी 10 वाजता गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर होणार आहे.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार, अपारंपरिक ऊर्जामंत्री श्री.अतुल सावे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री श्री.संजय शिरसाट, ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव ऊर्जा श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शेतकर्‍यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा उच्चांक गाठला आहे. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत शेतकर्‍यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून 30 टक्के तर राज्य सरकारकडून 60 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकर्‍यांना केवळ 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषिपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणार्‍या सर्व शेतकर्‍यांचा ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सुटणार आहे. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. शेतकर्‍यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकर्‍याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकर्‍याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते.

संबंधित बातम्या

Back to top button