महाराष्ट्र अव्वलच ! मुख्यमंत्र्यांचा दावा

दोन वर्षांत अर्थव्यवस्था ’युएई’ आणि सिंगापूरपेक्षा मोठी होणार

मुंबई /11 मार्च : महाराष्ट्राचा जीडीपी 2013 – 14 मध्ये 16 लाख कोटी होता. पुढील दहा वर्षांत आम्ही तो 51 लाख कोटींवर नेला. आमच्या काळात राज्याची अर्थव्यवस्था तीपटीहून अधिक वाढली. ही गती पाहता, येत्या दोन-तीन वर्षांत महाराष्ट्र सिंगापूर आणि युएईसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थांनाही मागे टाकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला.
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. विरोधकांनी उपस्थित केलेले विविध मुद्दे खोडून काढत त्यांनी राज्याच्या ’ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचा रोडमॅप सभागृहासमोर मांडला. विरोधकांच्या टीकेला सांख्यिकीय पुराव्यांनी उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विस्तारत आहे. महाराष्ट्र हे वेगळे राष्ट्र असते, तर आपली अर्थव्यवस्था जगात 30वी असती. पहिल्या 35 देशांचा विचार केला तर महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आणि बांगलादेश या देशांनाही मागे टाकत मोठी अर्थव्यवस्था उभी केली आहे. पुढील 2-3 वर्षांत युएई आणि सिंगापूर यांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकू. अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला नाही, अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना कधी विसरू शकत नाही. कारण, ते होते म्हणून आम्ही आहोत, असेही त्यांनी सांगितले. निधी वाटपात भाजपला झुकते माप मिळाल्याच्या आरोप जयंत पाटील यांनी केला. अर्थसंकल्पातील विभागनिहाय तरतुदी पाहता, 59 टक्के निधी भाजप, 22 टक्के शिवसेना आणि राष्ट्रवादीकडील खात्यांना केवळ 19 टक्के निधी मिळाल्याची टीका पाटील यांनी केली. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील आकडेवारीच मांडली. ते म्हणाले, मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेला (एकत्रित) केवळ 16 टक्के निधी मिळाला होता, तर राष्ट्रवादीने 57 टक्के स्वतःकडे ठेवला. काँग्रेसला 26 टक्के निधी देण्यात आला. त्यामुळे निधी हा खातेनिहाय मिळतो, पक्षनिहाय नाही, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

संबंधित बातम्या

Back to top button