कायदेशीर कारवाई पूर्ण झाली, अहवाल मागवला आहे
अजित पवार-अंजना कृष्णा प्रकरण

-मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
सोलापूर / 9 सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी फोनवर संवाद साधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणामुळे अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, या संदर्भात जी कायदेशीर कारवाई करायची होती, ती पूर्ण झाली आहे. सध्या प्रकरणाचा पूर्ण अहवाल माझ्याकडे आला नाही, तो जिल्हाधिकार्यांकडून मागवला आहे. अजित पवार यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले, खूप वेळा समोरच्या बाजूला काय चालले आहे, याची आपल्याला कल्पना नसते. अनेक वेळा आम्हाकडे निवेदने येतात आणि त्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही आदेश देतो. मात्र, निवेदनातील माहिती आणि प्रत्यक्ष स्थितीत फरक असतो. अशा परिस्थितीत अधिकारी आम्हाला प्रत्यक्ष माहिती देतात आणि त्या आधारावर कामे होते. अजित पवार यांनी याबाबत खुलासा केला आहे.
सोलापूरच्या कुर्डू गावातील मुरूम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांच्याशी अजित पवार यांनी फोनवर संवाद साधला होता. या संवादात उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले, ऐका, मी उपमुख्यमंत्री बोलत आहे. मी तुम्हाला आदेश देतो की कारवाई थांबवा. कार्यकर्त्याच्या मोबाइलवर फोन आल्यामुळे पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखले नाही. त्यावर अजित पवार संतापले आणि म्हणाले, तुमच्यावर कारवाई करू का? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल.




