‘लखपती दीदी’ : मुख्यमंत्री फडणवीसांकडून योजना जाहीर
बिनव्याजी कर्जातून महिलांना आर्थिक क्रांतीचे गिफ्ट

-प्रत्येक गावात पतसंस्था; अब्जावधीेंचा कर्जपुरवठा
-एक कोटी लाडक्या बहिणींना स्वप्नपूर्तीची संधी
छ. संभाजीनगर/ 17 सप्टेंबर : मराठवाडा मुक्ती दिनाच्या औचित्यावर राज्य सरकारने महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून महिलांचे प्रचंड पाठबळ मिळवत पुनश्च सत्ता मिळवलेल्या महायुती सरकारकडून आता महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा करताना राज्यातील एक कोटी महिलांच्या हातात आर्थिक स्वावलंबनाचे सामर्थ्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपयांच्या मानधनावर जगावे लागू नये. त्यांना उद्योग, व्यवसायासाठी स्वतःची ताकद निर्माण करता यावी म्हणून शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे. यासाठी प्रत्येक गावात जिल्हा बँक मार्फत महिला बचत गटांना बिनव्याजी 1 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाच्या पायावर सक्षम उद्योग उभारून महिला स्वतःचा व्यवसाय करतील आणि त्या स्वावलंबी बनतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी करणे, हा माझा संकल्प आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील या महत्वाकांक्षी मोहिमेला प्रारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे कार्यक्रम झाला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन यांचे औचित्य साधण्यात आले. या अंतर्गत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियान संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये 17 सप्टेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत राबविले जाणार आहे.
-पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात परिवर्तन
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून वर आणले, 15 कोटींना स्वतःचे घर देण्यात आले आणि सामान्य लोकांच्या जीवनात मूलभूत परिवर्तन घडवून आणण्यात आले. देशासमोर आज नवा आत्मविश्वास उभा आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच आजपासून देशभर ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत असल्याचेही सांगितले.




