खडसेंच्या जावयाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

खेवलकरांच्या जामीनाचा मार्ग मोकळा

पुणे / 31 जुलै : पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी (ता. 26 जुलै) रात्री पोलिसांनी एका फ्लॅटवर छापा टाकला होता. या फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी या फ्लॅटमधून पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले होते. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता. या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खेवलकरांना सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी (ता. 31 जुलै) पुन्हा या प्रकरणी खेवलकरांना न्यायालयात हजर करण्यात आले. ज्यानंतर न्यायालयाने खेवलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुरुवारी पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आरोपी असलेले प्रांजल खेवलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पुणे पोलिसांनी आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. पण न्यायालयाने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली. तसेच, खेवलकर यांच्यासह अटकेत असलेल्या चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जाहीर केली. त्यामुळे आता या आरोपींना जामीनासाठी अर्ज करता येणार असून त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या सुनावणीवेळी पुणे पोलिसांनी खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडल्याची माहिती न्यायालयात दिली. खेवलकरांनी एका मुलीचे व्हिडीओ दुसर्‍या आरोपीला पाठवत ‘ऐसा माल चाहिए’ असा मेसेज केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. तर आरोपी प्रांजल खेवलकरांच्या वकीलांनी यावेळी युक्तीवाद करताना सगळा तपास पूर्ण झाला आहे, असा युक्तीवाद करत म्हटले की, आता पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. पोलिसांकडून न्यायालयाची फसवणूक करण्यात येत आहे. खेवलकर यांना अडकवण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले जात आहेत. पार्टीत उपस्थित मुलींशी खेवलकर यांचा काहीही संबंध नाही, असाहा युक्तीवाद यावेळी खेवलकरांच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button