जरांगे पाटीलांचा फडणवीस सरकारला अल्टिमेटम
आरक्षणाशिवाय आम्ही मागे हटणार नाही

-संघर्ष टोकाला, सरकारसमोर आव्हान
-27 ऑगस्टपासून चलो मुंबई मोर्चा
मुंबई / 25 ऑगस्ट : मराठा समाजात पुन्हा एकदा अस्वस्थता, संताप आणि आंदोलनाची उग्र लाट उसळली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर थेट हल्ला चढवला. आरक्षणाशिवाय आम्ही परतणार नाही, एकदा चाललो की आम्हाला कोणी थांबवू शकणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिला आहे.
मराठ्यांचा प्रश्न निकाली लागेपर्यंत लढा सुरूच राहणार अशा भूमिकेसह 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली साराटीतून मोर्चाचे प्रस्थान होईल. मार्गात जुन्नर, शिवनेरी, राजगुरू नगर, खेड, चाकण, लोणावळा, पनवेल, वाशी अशा टप्प्यांवरून हजारो आंदोलक 28 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रवेश करतील. 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करून मराठा आरक्षणाची गाजावाजा होण्याऐवजी अंतिम तोडगा काढल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा जरांगे यांनी दिला. हक्काचे आरक्षण आमचे आहे. मराठा व कुणबी हे एकच आहेत, फक्त शासनाची शिक्कामोर्तबाची गरज आहे. फडणवीस सरकारने हे सत्य मान्य करावं. 10 टक्क्यांचं तात्पुरतं आरक्षण आमच्यासाठी अपमानकारक आहे. हक्काचं घर हवं, तात्पुरता निवारा नव्हे.
मराठा आरक्षणाचा हा प्रश्न आता फक्त आंदोलनापुरता उरला नाही. ग्रामीण भागातून उफाळलेली ही संतप्त ज्वाला थेट मुंबई गाठणार आहे. आधीच राज्य सरकार भूषण, गृहनिर्माण, शेती विषयक समस्यांमध्ये अडचणीत असताना, मराठा आरक्षणाचा प्रश्न विरुद्ध प्रतिष्ठा असं स्वरूप धारण होऊ लागलं आहे. मोर्चात आमचा उद्देश वाहतूक ठप्प करणे नाही. पण या लढ्याला अडवलं तर परिस्थिती सरकारसाठी हाताबाहेर जाईल, असा इशारा जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.




