‘जय हिंद, जय भारत…’

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचले शुभांशु शुक्ला

-प्रवेश करताच हिंदीतून निवेदन
-नवा विक्रम प्रस्थापित केला
नवी दिल्ली/ 26 जून : भारताच्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर अखेर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात यशस्वीरित्या पोहोचले आहेत. राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षांनी शुभांशू शुक्ला यांच्या रुपाने भारतीय अंतराळवीराने अवकाशात झेप घेतली. क्सिऑम-4 मोहिमेंतर्गत ‘स्पेस एक्स’चे ‘फाल्कन-9’ हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचल्यानंतर तेथील अंतराळवीरांनी शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही जणांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले.
शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचल्यानंतर आपला अनुभव कथन केला. ते म्हणाले, इथे कॅमेर्‍यासमोर उभे राहणे सोपे नाही. पुढचे दोन आठवडे रोमांचकारी असणार आहेत. डोकं थोडं जड वाटत आहे. तसेच स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांना अंतराळवीर क्र. 643 देण्यात आला आहे. शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून हिंदीतून आपला संदेश दिला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने या संदेशाचा व्हिडीओ शेअर केला. शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांनी हिंदीतून निवेदन दिले. ते म्हणाले, तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मी इथे सुखरुप पोहोचलो आहे. इथे उभे राहणे सोपे वाटत असले तरी तसे कठीण आहे. येत्या काही दिवसात इथल्या वातावरणाची मला सवय आहे. पुढील 14 दिवस आम्ही इथे अनेक संशोधन करणार आहोत. काही वेळापूर्वी ड्रॅगनमध्ये असताना मी तुम्हा सर्वांशी संवाद साधला होता. यापुढे मी रोज आपल्याशी बोलत राहिल. जय हिंद, जय भारत.
शुभांशू शुक्ला पुढे म्हणाले की, मी अंतराळात येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात प्रवेश करताच येथील क्रूने आमचे उस्फुर्त असे स्वागत केले. कुणीतरी आपल्यासाठी घराचे दरवाजे उघडत आहे, असा भास आम्हाला झाला. ही खूप आनंद देणारी बाब होती. इथे येण्यापूर्वी ज्या काही माझ्या अपेक्षा होत्या, त्या आताच पूर्ण झाल्यासारख्या वाटत आहेत. आज सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला यशस्वीरित्या जोडले गेले, असे नासाने आपल्या निवेदनात जाहीर केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button