भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य

मोदी स्टार्मर भेटीत लिहिला गेला मैत्रीचा नवा अध्याय

* आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा

* आधार व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी

मुंबई /9 ऑक्टोबर : भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. या संबंधांना लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवर आधारित परस्पर सामायिक दृष्टीकोन आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत आणि ब्रिटन दरम्यानची वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले असून व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी निर्माण झाल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कीर स्टार्मर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, मुंबईतील राजभवन येथे त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केले. यावेळी प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, यावर्षी जुलै महिन्यात ब्रिटन दौऱ्यादरम्यान ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर सहमती मिळाली आहे, ज्यामुळे व्यापार आणि रोजगार निर्मिती वाढेल तसेच ग्राहक आणि उद्योग क्षेत्र दोघांनाही लाभ होईल. ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे व्यावसायिक प्रतिनिधी मंडळ ही भागीदारीतील नव्या ऊर्जेचे द्योतक असल्याचेही त्यांनी नमूद केले. उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींच्या शिखर परिषद, सीईओ मंच आणि जागतिक फिनटेक महोत्सव यांच्या माध्यमातून सहकार्याच्या नव्या शक्यता समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये इंडो-पॅसिफिक आणि पश्चिम आशियातील स्थैर्य तसेच युक्रेनमधील संघर्षावरही विचारांची देवाणघेवाण झाली. भारत युक्रेन आणि गाझा प्रकरणांवर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याच्या सर्व प्रयत्नांचे समर्थन करतो, असे मोदी म्हणाले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षा विषयक सहकार्य वाढविण्यास भारत वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमातून नवोन्मेषाला चालना मिळत असून, दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात अमर्याद सहकार्याची क्षमता आहे, असेही प्रधानमंत्री मोदी म्हणाले. त्यांनी ब्रिटनची औद्योगिक तज्ज्ञता आणि संशोधन क्षमता भारताच्या प्रतिभा व व्याप्तीसह जोडल्याचे नमूद केले. खनिज क्षेत्रातील सहयोगासाठी नवीन उद्योग संघ स्थापन केला जात असून त्याचा सॅटेलाईट कँपस आयएसएम धनबाद येथे असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शोशत विकासासाठी भारत-युके ऑफशोअर विंड टास्कफोर्स आणि हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप निधी स्थापन करण्यात आला आहे. तसेच ब्रिटनमधील नऊ विद्यापीठे भारतात त्यांचे कॅम्पस सुरू करत आहेत. साऊदम्टन विद्यापीठाचे गुरूग्राम कॅम्पस उद्घाटन झाले असून, गिफ्ट सिटीमध्ये आणखी तीन विद्यापीठांच्या शाखा उभारल्या जात आहेत.

 

संबंधित बातम्या

Back to top button