जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभ बनू शकतो
मुंबईतून पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

मुंबई/29 ऑक्टोबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबईत ‘इंडिया मेरीटाइम वीक-2025’ दरम्यान आयोजित मेरीटाइम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये भाषण केले. यामध्ये ते म्हणाले की, जागतिक तणाव, व्यापारातील अडथळे आणि बदलत्या पुरवठा साखळ्यांमध्ये भारत जगासाठी दीपस्तंभ बनू शकतो. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचाही उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यांनी केवळ सागरी सुरक्षेचा पाया घातला नाही, तर अरबी समुद्रातील व्यापारी मार्गांवर भारताचे वर्चस्व अभि मानाने प्रस्थापित केले. जेव्हा जागतिक समुद्र अशांत असतात, तेव्हा जग एका स्थिर दीपस्तंभाचा शोध घेते आणि भारत तो दीपस्तंभ बनू शकतो. भारत हा धोरणात्मक स्वायत्तता, शांतता आणि समावेशक विकासाचे प्रतीक आहे. भारताची लोकशाही व्यवस्था आणि विश्वासार्हता त्याला अद्वितीय बनवते.पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे सागरी क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे आणि भारताची बंदरे आता विकसनशील देशांमध्ये सर्वात कार्यक्षम मानली जातात. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, आधुनिक कायद्यांनी वसाहतवादी काळातील जुन्या शिपिंग कायद्यांची जागा घेतली आहे. मेरीटाइम इंडिया व्हिजन अंतर्गत 150 हून अधिक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत, ज्यामुळे बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे आणि मालवाहतूक 700% वाढली आहे. देशातील सक्रिय जलमार्गांची संख्या तीनवरून 32 पर्यंत वाढली आहे.




