मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढणार
भाजपा-शिवसेनेत झाली पहिली बैठक

* नवाब मलिक यांच्यामुळे राष्ट्रवादीला विरोध
मुंबई/16 डिसेंबर – महापालिकां निवडणुकीच्या अनुषंगाने आता भाजपा आणि शिवसेनेची पहिली बैठक झाली असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवण्यात येणार असल्याचे भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले आहे. तर, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. तर शिवसेनेचे नवाब मलिक यांनी थेटपणे जी भाजपाची भूमिका तीच आमची भूमिका असे स्पष्टपणे सांगितले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मंगळवारी शिवसेना आणि भाजपामध्ये पहिली बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे नेते अतुल भातखळकर, प्रविण दरेकर उपस्थित होते, तर, शिवसेनेकडून (शिंदे गट) माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश सुर्वे, महिला नेत्या शितल म्हात्रे उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 227 जागांवर महायुती निवडणूक लढेल. महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. महायुतीचा महापौर कसा निवडणून येईल? 150 पेक्षा जास्त जागा महायुती कशा जिंकेल? यासाठी ही चर्चा झाली आहे. महायुतीचा महापौर मुंबईच्या महापालिकेमध्ये विराजमान करण्याच्या दृष्टीकोनातून ही चर्चा झाली असल्याचे यावेळी अमित साटम यांनी सांगितले.
शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव- दोन्ही पक्षाकडून जागावाटपासंदर्भात आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने शिवसेनेला केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून आपणास 125 जागा मिळाव्या यासाठी आग्रह आहे. भाजपकडून थेट आकडेवारी सांगत वार्डातील जागांची यादीच समोर ठेवण्यात आली. त्यानुसार, एकनाश शिंदेंच्या शिवसेनेची ताकद असलेल्या 52 जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे.




