महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन

* इतर भाषेचा विरोध करणे चुकीचे

सातारा/2 जानेवारी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन महापालिका निवडणुकीत मराठी भाषेवर मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची आहे. इतर भाषा सक्तीची नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते सातार्‍यातील 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
यावेळी फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेचं स्वागत करताना इतर भाषेचा विरोध करणे चुकीचे असल्याचे फडणवीसांनी म्हटलं. राज्यात इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय रद्द केला. तसेच या मुद्यावरून एका समितीची देखील स्थापना केली. भाषा सक्तीच्या विषयावर फडणवीसांनी महत्वाचं भाष्य केलं. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ’मुख्यमंत्री म्हणून स्पष्ट करतो की, महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची आहे. इतर कोणतीही भाषा सक्तीची नाही. त्रिभाषिक सूत्रावरून मतभेद होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची कोणतीही भाषा शिकण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु तिसरी भाषा कोणत्या वर्गातून शिकवण्यास सुरू करण्याबाबतचा प्रश्न होता’. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ’महाविकास आघाडी सरकारच्या काळात तयार केलेल्या अहवालात पहिलीपासून हिंदी सक्तीची शिफारस करण्यात आली होती. त्यांच्याच सरकारने हा प्रस्ताव पुढे ढकलला होता’. ’पहिलीपासून इतर भाषा सक्ती करण्याबाबत व्यापक चर्चा झाली. पहिलीपासून त्रिभाषिक सूत्राला विरोध झाला. त्यामुळे अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे,असे ते म्हणाले. ’मी पुन्हा सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची आहे. इतर कोणतीही भाषा नाही, असे फडणवीस पुढे म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, मला खेदाने सांगायचे आहे की, ’आम्ही इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश सारख्या भाषांचे खुल्या हाताने स्वागत करतो. या आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने आमचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. परंतु भारतीय भाषांना विरोधात करताना आंतरराष्ट्रीय भाषांचे स्वागत करणे अन्यायकार आहे. भारतातील भाषांनाही तो आदर मिळाला पाहिजे’.

संबंधित बातम्या

Back to top button