क्षुल्लक वादातून भावानेच केली मोठ्या भावाची निर्घृण हत्या
हिंगोली येथील थरारक घटना

हिंगोली/15 जानेवारी : वसमत तालुक्यातील मौजे रांजोणा येथे माणुसकीला आणि रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शेतीतील कामाच्या किरकोळ वादातून एका 23 वर्षीय तरुणाने आपल्या 25 वर्षीय सख्ख्या मोठ्या भावाच्या डोक्यात कुर्हाड घालून त्याची निर्घृण हत्या केली.
नवनाथ नामदेव सावळे असे मयताचे नाव असून, त्याचा धाकटा भाऊ गजानन सावळे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हिंगोली पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या खुनाचा छडा अवघ्या दोन तासांत लागला. मिळालेली माहिती अशी की, 15 जानेवारी रोजी पहाटे रांजोणा शिवारातील नामदेव सावळे यांच्या शेत आखाड्यावर नवनाथचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने नवनाथचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि डीवायएसपी राजकुमार केंद्रे यांच्यासह मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
पोलिसांची चाणाक्ष नजर अन् आरोपीची कबुली -सुरुवातीला हा खून कोणी केला असावा याचा कोणताही सुगावा लागत नव्हता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा केला असता आडोशाला लपवलेली रक्ताने माखलेली कुर्हाड सापडली. तपासादरम्यान पोलीस अधिकारी संग्राम जाधव आणि त्यांच्या पथकाला मृताचा धाकटा भाऊ गजानन याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तो पोलिसांसमोर सर्व सामान्य वागण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.




