हिंमत असेल तर, महाराष्ट्राबाहेर या! आपटून आपटून मारु….
भाजप खासदारानं ओकली गरळ

-म्हणाले…मराठी लोक कुणाची भाकर खाताहेत?
-निशिकांत दुबेंकडून वादाला खतपाणी
मुंबई / 7 जुलै: मीरा भाईंदर येथे व्यापार्याला मनसेकडून मारहाण झाल्यानंतर आता हिंदी-मराठी वाद पेटला आहे, यात भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी खतपाणी घातलं आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची भावना निर्माण झाली आहे. तुम्ही कुणाची भाकरी खाताहेत, येथे टाटा, बिर्ला, अंबानी आहेत, तेच टॅक्स भरतात, मराठी लोक कुठला टॅक्स भरतात,आमच्या पैशावर तुम्ही जगत आहात, तुमच्यात हिमंत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर या, युपी, बिहार, तामिळनाडू मध्ये या, तिथं तुम्हाला आपटून आपटून मारु, अशी गरळ भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ओकली. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
निशिकांत दुबे हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. त्यामुळे त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींनी अडचणीत आणले आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठींना त्यांना समज देणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. काल त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात गरळ ओकली होती. आज त्यांनी केलेल्या संतापजनक विधानामुळे मराठी माणसामध्ये त्यांच्याविरोधात तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना मारहाण करीत आहेत. त्यांन तुम्हाला मारायचं असेल तर त्यांना मुंबईतील तामिळी, तेलुगु आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारुन दाखवावे. माहिममध्ये जाऊन हिंदी भाषिकांसोबत उर्दु भाषिकाला ठाकरे बंधूंनी मारुन दाखवले तर मी त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार असल्याचे मानेल, आम्ही मराठीचा सन्मान करतो पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही, असे दुबे यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी गरळ ओकणार्या निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालायाचे सरन्यायाधीश तसेच निवडणूक आयोगाच्या माजी आयुक्तांना देखील सोडले नव्हते. त्यांनी यांच्या विषयी देखील वादग्रस्त वक्तव्य केली होती. ती पुन्हा चर्चेत आली आहेत. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविषयी सर्वोच्य न्यायायाने निर्णय देताना काही सुधारणा लगेच लागू करण्यास निर्बंध घातला होता. यावर याचिकाकर्ते व सरकारचे म्हणणे सर्वोच्य न्यायालयाने सादर करण्यास सांगितले होते. त्यावरून दुबे म्हणाले होते की, न्यायालय आपली मर्यादा ओलांडत आहे. जर देशात गृहयुद्ध झाले तर त्याला सरन्यायाधीश जबाबदार असतील. दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या सर्वोच्च न्यायालायाने दखल घेत त्यांच्याविरोधात केस दाखल करण्याचे आदेश दिले होते.
निशिकांत दुबे यांनी माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरैशी यांच्यावर देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. कुरैशी यांनी वक्फ बोर्डा विधेयकावर मत व्यक्त केल्यानंतर दुबे म्हणाले होते की, कुरैशी हे निवडणूक आयुक्त नव्हते तर ते फक्त मुस्लिम निवडणूक आयुक्त होते. महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकणार्या निशिकांत दुबे यांनी मागे केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधात भाजपने काही ठोस भूमिका घेतल्याचे दिसत नाही. ही मते त्यांची वैयक्तिक आहेत. त्याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही, अशी विधान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली होती.
-महाराष्ट्रात संतापाची लाट
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी टॅक्ससंदर्भात चिथावणीखोर विधान केल्यानंतर त्यांच्याविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी आकडेवारी देत दुबेंना धारेवर धरले आहे. त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा एकदा सल्ला घेतला असता तर असे बोलताना शंभरवेळा विचार केला असता. किमान केंद्रातील त्यांच्याच सरकारकडून वस्तू व सेवा कराची म्हणजेच जीएसटी कलेक्शनची माहिती घेतली असती तर त्यांचे डोळे पांढरे झाले असते. जीएसटीमध्ये महाराष्ट्र हा देशात सातत्याने अव्वल स्थानी आहे. फार लांबची नाही, तर नुकत्याच संपलेल्या जून महिन्याची आकडेवारीही त्यासाठी पुरेशी आहे, अशा शब्दात समाज माध्यमांवरुन दुबेवर हल्लाबोल केला जात आहे.




