हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये

भाजपाचे आ. गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान

मुंबई/17 ऑक्टोबर – भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे अनेकदा वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात; विरोधकांवर टीका करताना किंवा हिंदुत्वाचे मुद्दे उपस्थित करताना त्यांनी केलेली विधाने अनेकदा वादात अडकली आहेत. आता नुकतेच त्यांनी बीड जिल्ह्यात केलेल्या विधानानंतर वाद उद्भवला आहे — हिंदू महिला आणि मुलींनी जिममध्ये जाऊ नये, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हे तुरूंगात धर्मांतराचे रॅकेट चालवतात, असा आरोप आमदार पडळकर यांनी केला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यात एका सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते; या सभेत बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी मुली आणि महिलांना आवाहन केले: जिममध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा? आपल्या तरुण मुली जिममध्ये जात असतील तर त्यांना सांगा घरातच योगा करा, तिकडे जाण्याची गरज नाही, ते तुम्हाला फसवत आहेत, तुमच्यावर अन्याय करत आहेत. तसेच ज्या शहरात महाविद्यालये आहेत, त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सोडून दुसर्‍या कोणत्याही पुरूषाला किंवा मुलास प्रवेश देता कामा नये; महाविद्यालय परिसरात जिहादी प्रवृत्तीची मुले दिसली तर पोलिसांनी त्यांना धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी पडळकरांनी केली. पोलिसांना ते म्हणाले की, हे खूप मोठे षडयंत्र आहे. पडळकर पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यात जिहादी प्रवृत्तीच्या लोकांची प्रकरणे अधिक व्हायला लागली आहेत — दुसर्‍यांची जमीन ताब्यात घेणे, सरकारी जमीनवर अतिक्रमण करणे, तिथे झोपडपट्टी उभी करणे, वेगवेगळे व्यवसाय उभे करणे, देशी गाईंची कत्तल करणे; हे प्रकार कुणी रोखण्यास गेले तर त्यांना मारहाण करून त्यांच्या तक्रारींचे निवारण होत नसल्याचे त्यांनी नोंदवले. गावागावात असे अनेक प्रकार घडत आहेत, जिल्ह्यातील एका कोट्यधीशाच्या मुलीला फूस लावून तिचे लग्न लावून घेतले, असे अनेक प्रकरणे घडली आहेत; या प्रकरणांच्या बाबतीत लोकांमध्ये जागृती होण्याची गरज आहे, असा त्यांचा दावा होता. मुख्यमंत्री अशा प्रकारांच्या विरोधात आहेत, विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती; सर्वधर्म समभावाच्या नावाखाली हे प्रकार खपवून घेणार नाही, असेही आमदार पडळकर म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button