मराठवाडा-विदर्भात मुसळधार पाऊस
राज्यातील 23 जिल्ह्यांना इशारा

मुंबई / 11 सप्टेंबर : महाराष्ट्र पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार तडाख्यात सापडणार आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील तब्बल 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, 12 सप्टेंबरला विदर्भातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई व कोकणात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता सौम्य पातळीवर राहणार आहे. येथील आकाश ढगाळ असले तरी हलक्या सरींवरच मर्यादा राहील. मुंबईत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोरदार मारा सुरू राहील. भंडार्यात आधीच विजेच्या धडाक्यात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार आहे. धाराशिव व लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. सोलापूरमधील होटगी तलाव परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे दृश्य ड्रोनद्वारे समोर आले आहे.
अहिल्यानगर (औरंगाबाद) जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नाशिक, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यभरात पावसाचा जोर वाढत असतानाच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नद्या-नाल्यांना पूर येण्याचा धोका असल्याने खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.




