एमआयएमने ने शोधला ‘वंचित’ला पर्याय?

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘रावण’ची एण्ट्री

-राज्यात ‘एमडी’ फॅक्टर किंगमेकर?
मुंबई / 7 जुलै: स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यात नवनवी समीकरण तयार होत आहेत. त्यातच आता वंचितच्या व्होट बँकेला धक्का देण्यासाठी एमआयएमने नवा भिडू शोधलाय. त्यांनी थेट वंचितला पर्याय उभा करण्यासाठी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीला निमंत्रण दिलंय. तर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी त्यासंदर्भात बैठक झालीय.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता एमआयएमने सोशल इंजिनिअरिंग सुरु केलीय. तर मुंबईसह शहरी भागात काँग्रेस आणि वंचितची व्होट बँक असलेल्या दलित आणि मुस्लीम व्होटबँककडे एमआयएमने आपला मोर्चा वळवलाय. त्यामुळेच वंचितकडील दलित मतं आपल्याकडे वळवण्यासाठी आझाद समाज पार्टीचा पर्याय उभा केला जातोय. कारण राज्यात वंचित बहुजन आघाडीची मजबूत व्होट बँक आहे.
2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला 7.64 टक्के मतदान झाले होते. वंचितला 38 जागांवर तब्बल 37 लाख 43 हजार 200 मतं प्राप्त झाली होती. 2024 लोकसभा निवडणुकीत वंचितला 15 लाख 66 हजार 949 मतं मिळाली. मात्र जय भीम, जय मीमचा नारा देणार्‍या एमआयएमने महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांसोबत युतीचं समीकरण जुळवण्यापेक्षा थेट राष्ट्रीय पातळीवरील चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना का गळाला लावलंय. भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद दलित समाजाचा आकर्षणबिंदू ठरले आहेत. शहरी भागात चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव जाणवतो. राज्यात दलित आणि मुस्लीम फॅक्टर महत्वाचा आहे. एमआयएम स्वतंत्र लढल्यास अवघ्या 0.4 टक्के मतांपर्यंतच मजल मारु शकते, असा अनूभव आहे. दलित आणि मुस्लीम मतं एकत्र आल्यास 41 लाख एकगठ्ठा मतं मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील बहुतांश दलित समाज वंचितच्या बाजूने उभा असल्याचे सध्या दिसून येते. खरंतर 2014 नंतर असदुद्दीन ओवैसींनी महाराष्ट्रात एण्ट्री केली. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभेतही आपला करिष्मा दाखवून दिला. मात्र 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेत त्यांना फटका बसला. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भुमिकेत राहण्यासाठीच वंचितला पर्याय उभा करुन एमआयएम आझाद समाज पार्टीसोबत नवं समीकरण सांधतंय. मात्र दलित समाज प्रकाश आंबेडकरांना सोडून चंद्रशेखर आझाद यांच्या मागे उभा राहणार का? यावर युतीचं यश अवलंबून असणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button