सरकारला नैतिक कर्तव्याचा विसर
खा.सुळे यांचा भाजपावर चौफेर हल्ला

मुंबई/23 नोव्हेंबर – भाजपाने सुरू केलेला फोडाफोडाचा नवा ट्रेंड लोकशाहीच्या अस्तित्वासाठी घातक आहे. धमक्यांची भाषा बोलणार्या सरकारवर निवडणूक आयोगाचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगावरच्या श्रद्धेला तडा जात आहे. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत भाजपाने आणलेला पळवापळवी आणि फोडाफोडीचा ट्रेंड लोकशाही आणि संविधानाच्या अस्तित्वासाठी घातक आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुसंस्कृत राजकारणाचे बोट सोडलेल्या भाजपाने अनैतिकतेच्या मर्यादा ओलांडल्या. विरोधकांना कोर्ट कचेर्यात गुंतवून भाजपा सोयीचे राजकारण करत आहे. काश्मीर ते कन्याकुमारी फोडाफोडीचे राजकारण करणार्या भाजपाने अत्यंत चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष फोडला, अशी टीकाही त्यांनी केली.




