बनावट नोटा तयार करणार्‍यांची टोळी जेरबंद

1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त

* पोलीस दलातील हवालदार मास्टर माईंड : 5 जणांना अटक

मिरज /10 ऑक्टोबर : कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला मिरज पोलिसांनी जेरबंद केले असून, या प्रकरणात कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार हा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. त्याच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली असून, इनोव्हा कारसह एकूण 1.11 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार (वय 44, रा. विेशकर्मा अपार्टमेंट, कसबा बावडा, जि. कोल्हापूर), सुप्रीत काहाण्या देसाई (वय 22, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), राहुल राजाराम जाधव (वय 33, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय 40, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय 28, रा. रिद्ध गार्डन, ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई) यांचा समावेश आहे.

या टोळीने चलनातील 500 आणि 200 रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा तयार करून त्या बाजारात खपविण्याचा प्रयत्न केला होता. मिरज येथे या नोटा खपवण्यासाठी आलेल्या एका संशयिताला पोलिसांनी पकडले आणि चौकशीतून उर्वरित आरोपींचा पर्दाफाश झाला. पुढील तपासात उघड झाले की, या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार इब्रार इनामदार आहे.

या प्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती सांगताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button