सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 717 कोटींचा निधी वितरीत

मुंबई /7 डिसेंबर : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 13 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे तपोवनातील साधुग्रामचा वाद पेटला असतानाच सरकारने कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी 717 कोटींच्या निधीचा दुसरा हप्ता वितरीत केला आहे. हा निधी कुंभमेळा आराखड्यातील विकासकामांवरत खर्च करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
नाशिकमध्ये 13 ऑक्टोबर 2026पासून सुरू होणारा सिंहस्थ कुंभमेळा 24 जुलै 2028 पर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी सरकारकडून विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. यासाठी 2025-26 या कालावधीत करण्यात येणार्या कामांसाठी सरकारकडून 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण निर्माण करण्यात आले असून या प्राधिकरणाला अर्थसंकल्पीय तरतूदींपैकी 283 कोटी रुपयांचा निधी 15 ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला होता. उर्वरित 717 कोटी रुपयांचा निधी वित्त विभागाच्या मान्यतेनंतर वित्तरित करण्याचा निर्णय नगर विकास विभागाकडून घेण्यात आला. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
कुंभमेळ्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामाचा आराखडा राज्य सरकारकडून यापूर्वीच मंजूर करण्यात आला असून त्याच कामावर हा निधी खर्च करण्यात यावा असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. निधीचा वापर करताना यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना, निकष तसेच अटींचे संपूर्ण पालन करण्याची जबाबदारी ही नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच नाशिकचे विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. संबंधित कामांना सक्षम प्राधिकरणाची प्रशासकीय अशिण तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतरच निधी संबंधित यंत्रणांना वितरीत करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.




