हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या

पोलिस निरीक्षकावर बलात्काराचा आरोप, फलटणमधील धक्कादायक घटना

सातारा/24 ऑक्टोबरजिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टर तरूणीच्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहून ठेवलेले आढळले असून, त्याचा फोटो माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. या फोटोत एका पोलीस उपनिरीक्षकाचा उल्लेख असल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृत डॉक्टर तरूणीच्या भावाने माध्यमांशी बोलताना अनेक धक्कादायक आरोप केले आहेत आणि कुटुंबीयांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

भाऊने सांगितले की, डॉक्टर तरूणी दोन वर्षांपूर्वी फलटण उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाली होती. मागील वर्षभरापासून तिला नेहमीच शवविच्छेदन विभागात ड्युटी लावली जात होती, आणि त्या वेळी राजकीय मंडळी दबाव टाकत असत. काही प्रकरणांमध्ये रुग्ण रुग्णालयात नसतानाही त्याच्या नावाने रिपोर्ट बनवून मागितला जात होता, ज्यामुळे सततचा दबाव तिला असह्य झाला होता. याबाबत तिने तिच्या मोठ्या बहिणीला माहिती दिली होती, जी वैद्यकीय अधिकारी आहे, परंतु कुणालाही हे प्रकरण इतके गंभीर होईल असे वाटले नव्हते. दोन दिवसांपासून तिचे आणि कुटुंबियांचे बोलणेही झाले नव्हते.

जून महिन्यात बहिणीने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांना पत्र देऊन तक्रार दिली होती, आणि त्याची पोचपावती कुटुंबाकडे आहे, परंतु तरीही त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती, अशी खंत भावाने व्यक्त केली. एफआयआर दाखल करण्यासाठी 4 ते 5 तास लागले, तर शवविच्छेदनासाठी दोन ते तीन तास कोणतेही डॉक्टर आले नाहीत. या प्रकरणात राजकीय दबाव झाल्याचा कुटुंबीयांचा संशय आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माहिती दिली की, याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकास निलंबित केले गेले आहे, परंतु कुटुंबीयांनी एफआयआर दाखल करण्यास झालेल्या उशीरावर नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button