तीन महिन्यांपूर्वी पतीची हत्या, विरहात पत्नीने घेतला गळफास
मसानगंज परिसरातील घटना

-आत्महत्येपूर्वी लिहले भावनात्मक पत्र
अमरावती / 26 जून: तीन महिन्यांपूर्वी पतीची जून्या वैमनस्यातून हत्या करण्यात आली. तेव्हापासून जबर मानसिक आघात झालेली पत्नी स्वत:ला सावरुच शकली नाही आणि तिनेही पतीच्या विरहात आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, रात्री 9 वाजताच्या सुमारास शहरातील मसानगंज परिसरात घडली. ईशिका आदर्श गुप्ता असे मृतक महिलेचे नाव आहे. 25 वर्षीय ईशिकाने मृत्युपूर्वी एक पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्याला सतत पतीची आठवण येते, त्यांच्याशिवाय आपण राहू शकत नाही, म्हणून आत्महत्या करित असल्याचे तिने पत्रात नमूद केले आहे.
ईशिका गुप्ता हिचा पती आदर्श गुप्ता याची सुमारे तीन महिन्यांपूर्वी 2 मार्च 2025 रोजी कडबी बाजार परिसरात काही युवकांनी जून्या वैमनस्यातून चाकूने वार करुन निर्घुन हत्या केली होती. त्यावेळी आदर्श आणि ईशिका यांच्या लग्नाला जेमतेम एक वर्षच पूर्ण झाले होते आणि त्यांची मुलगी तेव्हा केवळ दोन महिन्यांची होती. पती आदर्शची हत्या करण्यात आल्यानंतर या घटनेचा ईशिकावर मोठा मानसिक आघात झाला होता. तेव्हापासून ती आपल्यातच राहत होती. ती कोणाशी बोलतही नव्हती. तिचे सासू-सासरे तिच्या चिमुकल्या मुलीचा सांभाळ करित होते. मात्र ईशिकाच्या मनात काय सुरु आहे, यापासून सर्वजण अनभिज्ञ होते.
अशातच बुधवारी रात्री ईशिकाने टोकाचे पाउल उचलले आणि राहत्या घरी स्वत:ला गळफास लावला. हा प्रकार समोर येताच कुटुंबियांनी शेजार्यांच्या मदतीने रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे मसानगंज परिसरात खळबळ उडाली असून रहिवाशांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच नागपूरी गेट पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी ईशिकाने लिहीलेली सुसाईड नोट हस्तगत केली. त्यातून पतीच्या आठवणीत ईशिकाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली आहे.
-सहा महिन्यांची चिमुकली पोरकी
ईशिका गुप्ता हिची मुलगी आता सहा महिन्यांची आहे. तीन महिन्यांपूर्वी वडिलांची हत्या आणि आता आईने आत्महत्या केल्याने या निरागस चिमुकलीचे माता-पित्याचे छत्र हरविले असून ती पोरकी झाली आहे. ईशिका ही बुंदेलखंडची रहिवासी होती. बुंदेलखंडी भाषेतच आपल्या सासू-सासर्यांना उद्देशून तिने सुसाईड नोट लिहीली आहे. आपल्या मुलीला शिकवून आयपीएस अधिकारी बनवा आणि आपल्या पतीच्या खूनाचा बदला घ्या, असे तिने मृत्युपूर्वी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. ईशिकाचे हे भावनाप्रधान पत्र वाचून अनेकांचे डोळे पाणावले होते.




