महाराष्ट्रात मत चोरीचे पुरावे, याद्यांमध्ये प्रचंड घोळ
शिरूर-हडपसरमध्ये हजारोंनी मतदार वाढ

-राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आरोप
-188 मतदार एकाच घरात
-अनेकांनी चार-पाच वेळा केलं मतदान
मुंबई / 22 ऑगस्ट : देशभरात मत चोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असताना आता महाराष्ट्रातदेखील या घोटाळ्याचा मोठा पत्ता लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मतदार याद्यांमध्ये प्रचंड गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी याआधी देशातील मत चोरीवरून आवाज उठवला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्रात निवडणूक आयोगासमोर पुरावे ठेवण्यात आले.
शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील शिरूर आणि हडपसर मतदार संघांमध्ये हजारोंनी मतदार वाढले असून ही वाढ संशयास्पद आहे. या गोंधळाबाबत लवकरच राज्यभरातील माहिती आम्ही निवडणूक आयोगापुढे मांडणार आहोत. मात्र, याचा फारसा उपयोग होईल अशी अपेक्षा नाही. कारण याआधीही संसद सदस्यांनी आंदोलन करून आवाज उठवला तरी आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. शिरूर मतदारसंघातील तत्कालीन उमेदवार अशोक पवार यांनी धक्कादायक खुलासा केला की, केसनन गावातील घर क्रमांक एकवर तब्बल 188 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्या घराचा कोणताही मालक नसल्याचं निवडणूक आयोगाच्या उत्तरातून उघड झालं. शिवाय एका मतदाराचं नाव तीन-चारवेळा यादीत दिसल्याचं त्यांनी दाखवून दिलं. एवढंच नाही तर शेजारच्या चार मतदार संघांतून तब्बल 17,442 मतदार दुबार नोंद झाल्याचा आरोपही करण्यात आला.
हडपसरमधील तत्कालीन उमेदवार प्रशांत जगताप यांनीदेखील मतदार याद्यांतील घोटाळा उघड केला. जून ते सप्टेंबर 2024 या फक्त तीन महिन्यांत 40,300 मतदारांची अचानक वाढ झाली. माझा पराभव फक्त 7100 मतांनी झाला, मात्र 49 हजार मतांची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाली. अनेकांनी चार-पाच वेळा मतदान केलं, असा गंभीर आरोप त्यांनी केला. याबाबत आयोगाला कागदपत्रांसह तक्रार केली असून, निवडणूक आयोगाने आकडेवारी मान्य केली पण नावांचा तपशील देण्यास नकार दिल्याचे जगताप यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील घोळ व मत चोरीच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
-उपराष्ट्रपती निवडणुकीत सत्ताधार्यांना पाठिंबा नाही
दरम्यान, पवार यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा न देण्याचाही निर्णय स्पष्ट केला. ते आमच्या विचारांचे नाहीत, म्हणून पाठिंबा देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. सत्ताधारी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचे, शरद पवार यांनी सांगितले.




