मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर वृद्धाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई / 30 सप्टेंबर : राज्यभरातील नागरिक दररोज मंत्रालयात आपली कामे घेऊन येत असतात, परंतु अनेकदा त्यांची कामे रखडली जातात आणि मागण्या पूर्ण होत नाहीत. यामुळे काही नागरिक नैराश्येतून मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. अशातच आज (३० सप्टेंबर) मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका वृद्धाने आत्मदहन करून स्वत:चा जीव संपवण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्ध व्यक्तीच्या परिसरात २४ तास भट्टी चालू होती आणि त्या भट्टीविरोधात त्यांनी नवी मुंबई महापालिका व पोलीसांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, निवेदनं दिली होती, मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे आज वृद्ध व्यक्ती मंत्रालयात रॉकेल घेऊन आला आणि प्रवेशद्वारावर नवी मुंबई महापालिका व पोलीसांविरोधात घोषणाबाजी करत स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, तैनात पोलिसांनी त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टाळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणारे वृद्ध कोण होते, त्यांना पोलीसांनी नेमका काय त्रास दिला, आणि त्यांच्या मागण्या काय होत्या, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. वृद्ध व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे, आणि लवकरच आत्मदहनाबाबत सर्व माहिती समोर येईल.




