एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’चा नारा
विरोधकांकडून टीका, सहकार्यांकडून पाठराखण

-शिंदेंनी बोलता-बोलता विकेट फेकल्याची चर्चा
-अधिवेशन व ठाकरेंच्या सभेतही फैरी झडणार!
पुणे / 4 जुलै: पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण संपविताना जय महाराष्ट्रसोबत जय गुजरातचा नारा दिला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. जय गुजरातचा नारा देण्याआधी शिंदेंकडून 2022 मधील सत्तानाट्याची आठवण काढत शहांचे तोंडभरून कौतुकही केले. एकनाथ शिंदेंनी दिलेल्या जय गुजराथच्या नार्यानंतर राजकारणात कोल्हेकुई सुरु झाली आहे. विरोधकांनी एकनाथ शिंदे यांचा यावरुन जोरदार समाचार घेतला. तर शिवसेना आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी मात्र त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या.
पुण्यात जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा दिली. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून माघार घेतल्याने सत्ताधारी महायुती दणदणीत बहुमत असूनही बॅकफुटवर गेल्याचा संदेश राज्यात काही दिवसांपूर्वी गेला होता. माघार घेतल्याने ठाकरे बंधूंचा संभाव्य एकत्रित मोर्चा टाळता येईल असा होरा शिंदे-फडणवीस जोडीचा होता. ऐन अधिवेशन काळात निघणारा हा मोर्चा त्रासदायक ठरू शकतो, अशी शक्यता वाटल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेण्याची तत्परता दाखवली असे बोलले जाते. पण शिंदे-फडणवीस जोडगोळीचा अंदाज चुकवत ठाकरे बंधूंनी थेट ’विजयी’ मेळाव्याची घोषणा केली. हाच विजयी मेळावा अवघा 24 तास उरला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या हातात आयते कोलित दिले आहे. पुण्यात शिंदे यांनी भाषण संपल्यावर जय हिंद, जय महाराष्ट्र म्हंटले, काही क्षण थांबले आणि पुन्हा जय गुजरातचा नारा दिला. आज याच विषयाची चर्चा असून शिंदे हे विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले आहे.
सध्या महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचा एकत्रित विजयी मेळावा यात दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. शिंदे यांची तयार झालेली प्रतिमा आणि त्यांचे व्हायरल झालेले ’जय गुजरात’ याचा ते कसा प्रतिकार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. जर ठाकरे बंधूंनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा विषय पेटता ठेवल्यास आणि त्यावर शिंदे यांनी समाधानकार पडदा न टाकल्यास त्यांच्यासाठी येत्या काळात हे प्रकरण अडचणीचे ठरणार हे नक्की.
-डूप्लिकेट शिवसेनेचे खरे रुप समोर आले
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंचा व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी फडणवीसांना टॅग केले आहे. राऊतांनी म्हटले आहे की, अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले. पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर जय गुजरात ची गर्जना केली. काय करायचे?, असा सवाल राऊतांनी केला आहे. ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या… असेही राऊत म्हणाले आहेत. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?, असा सवाल राऊतांनी फडणवीस यांना केला आहे.
-लांबलचक पोस्टमधून शिदेंचे स्पष्टीकरण
शिवसेनेच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर भलीमोठी पोस्ट करत एकनाथ शिंदे यांनी वादाला प्रत्युतर दिले आहे. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये गुजरातचे समर्थन करण्यात आले आहे. ‘जय गुजरात’ ही घोषणा नसून पुण्याच्या उत्साही, सकारात्मक आणि उद्यमशील गुजराती बांधवांच्या कर्तृत्वाला दिलेली दाद होती. त्याकडे तशाच नजरेने पाहायला हवे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, हे विरोधकांनी आधी लक्षात घ्यावे. ‘जय गुजरात’ म्हटल्यानंतर ज्यांना एवढा राग येतो, त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले तेव्हा त्यांचा राग कुठे गेला होता? असा प्रश्न शिंदे यांनी केला आहे.




