भाजप प्रवेश सोहळ्यावरून नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा राडा

माजी आमदारासह 5 बड्या नेत्यांच्या हाती कमळ

* देवयानी फरांदेंनी व्यक्त केली नाराजी

नाशिक/25 डिसेंबर – नाशिकच्या भाजप वसंतस्मृती कार्यालयामध्येही अटलजींच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागला आणि कार्यालयाबाहेरच मोठा राडा झाला. राडा इतका मोठा होता की त्यासाठी शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी हे भाजप कार्यालयामध्ये मोठा फौजफाटा घेऊन दाखल झाले. याचं कारण होतं ते म्हणजे आयारामांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश आणि निष्ठावंतांवर झालेला घोर अन्याय. खरं तर बुधवारी ठाकरे बंधु एकत्र आले आणि मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना अलिंगन देत दिवाळीच साजरी केली. नाशिक म्हणजे मनसे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यात काल दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवले आणि ढोल ताशांच्या गजरात बेधुंद नाचले. आणि त्याच बड्या नेत्यांनी थेट संकटमोचक गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं. मात्र, या पक्षप्रवेशाआधी नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी रान उठवलं आणि या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला. फरांदे यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाला विरोध करण्यासाठी मोठी गर्दी केली आणि फरांदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रवेशाचा निषेध केला आणि आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे सांगितले. तिकडे भाजप कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे यतीन वाघ, दिनकर पाटील आणि काँग्रेसचे शाहू खैरे हे आपल्या समर्थकांसह सूटाबुटात हजर झाले. हे समजताच फरांदे यांच्या कार्यालायबाहेरचा निष्ठावंतांचा फौजफाटा हा भाजप कार्यालयावर धडकला आणि परिस्थिती चिघळली. आपल्यावर अन्याय होतोय. आम्ही मागच्या अनेक वर्षांपासून पक्षात एकनिष्ठेने काम करतोय आणि ज्यांनी नेहमीच आपल्या पक्षावर सडकून टीका केली. आंदोलनावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना शिवीगाळ केली त्यांनाच तुम्ही ग्रीन कार्पेट अंथरत आहे. मंत्री गिरीश महाजनांनी कसंबसं या कार्यकर्त्यांना सावरलं आणि श्रद्धा सबुरीचा सल्ला दिला.
फरांदे यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू, मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध होता. पण तरीही पक्षाने हा पक्षप्रवेश करुन घेतला. देवयानी फरांदे यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्या प्रचंड भावूक झालेल्या बघायला मिळाल्या. मी अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या डोळ्यांसमोर जर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर हे काही मला बरोबर वाटलं नाही. जे आज पक्षात आलेले आहेत, पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते. पण आज जे काही घडलं ते मला आवडलेलं नाही, असं म्हणत असताना देवयानी फरांदे यांना कंठ दाटून आला.

संबंधित बातम्या

Back to top button