युवा शक्तीसाठी ‘नशामुक्त महाराष्ट्र’

नमो युवा रनची सुरवात

* मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून उद्घाटन

मुंबई/21 सप्टेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबई आणि पुणे येथे भाजपाच्या युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो युवा रन’ या उपक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून नशामुक्त मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त भारत या संदेशाचा जोरदार प्रचार करण्यात आला. युवा शक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि नशाबंदीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरला. मुंबईतील या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपण जी थिम घेतली आहे ती म्हणजे नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई. मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या देशाची तरुणाई फक्त देशभक्तीचीच नशा करेल. जर नशा करायचीच असेल, तर ती देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याची असावी, भारताला आत्मनिर्भर बनवण्याची असावी. हा दृढ निश्चय आणि संकल्प करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत. या दौर्‍याला मुंबई आणि उपनगरांतील हजारो तरुण-तरुणींनी उत्साहाने प्रतिसाद दिला. पहाटेपासूनच रस्त्यांच्या कडेला गर्दी दिसून आली आणि युवासेनेने नशामुक्त भारताच्या अभियानाला जोरदार पाठिंबा दिला. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत मंत्री आशिष शेलार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, खासदार तेजस्वी सूर्या, अभिनेता मिलिंद सोमण, मंत्री मगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुण्यात देखील याच संकल्पनेने ‘नमो युवा रन’ आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये विविध वयोगटातील युवक-युवतींनी सहभागी होऊन नशा विरुद्धचा संदेश दिला. दोन्ही शहरांतून चाललेल्या या दौर्‍यात युवकांनी नशाबंदी आणि सकारात्मक जीवनशैलीच्या महत्त्वावर भर दिला.

संबंधित बातम्या

Back to top button