ऑक्टोबरमध्येही धो-धो कोसळणार
50 वर्षांतील रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

* हवामान विभागाकडून अंदाज
मुंबई / 30 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस पुन्हा एकदा चांगलाच सक्रीय झाला आहे. गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टी झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमदार व खासदारांसह सर्वांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा केला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची शक्यता आहे. कारण बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते पश्चिमेकडे सरकत आहे, त्यामुळे मोसमी पाऊस अजून एक महिन्यापर्यंत सक्रिय राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात भारतात मान्सूनची तीव्रता सामान्यतः कमी होण्यास सुरुवात होते, परंतु यावेळी मान्सून अधिक सक्रीय आहे. कारण सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडला असून देशात आता ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या 115 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. या पावसामुळे गेल्या 50 वर्षांतील रेकॉर्ड तुटू शकतो, कारण काही भागात अजूनही आर्द्रता कायम आहे. या आर्द्रतेमुळे ऑक्टोबरमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.




