मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोपावर आज निर्णय

निवडणूक आयोगाची बैठक

मुंबई/26 ऑक्टोबर – गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली असून, संपूर्ण देशभरातील मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील घोषणा सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमधून करण्यात येणार आहे, जिथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांच्या नेतृत्वात संपूर्ण माहिती दिली जाईल.

मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 15 राज्यांचा समावेश केला जाईल, ज्यात 2026 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांचा समावेश असू शकतो. मतदार यादी पुनरीक्षण ही मतदार याद्यांना अद्ययावत आणि शुद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. यात नव्या मतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावे हटवणे, बनावट मतदारांची नावे हटवणे, तसेच मतदार यादीतील नावांचे स्थलांतर यासारखी कामे केली जातील.

भारतीय निवडणूक आयोग आगामी काळात मतदान होऊ घातलेल्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे. त्यात तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांचा समावेश आहे, जिथे 2026 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत या राज्यांमधील मतदार याद्यांचे पुनरीक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच, गेल्या काही दिवसांत मतदार यादीतील घोळावरून वाद पेटलेल्या महाराष्ट्राबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button