हरकतींसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत

महापालिकांच्या मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

अंतिम यादी 10 डिसेंबरला होणार प्रसिद्ध

मुंबई/26 नोव्हेंबर – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि जनतेचे लक्ष लागले असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (2025) मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून, सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार आता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 3 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
काय आहे सुधारित कार्यक्रम?-राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून मतदार यादीचा नवीन कार्यक्रम कळवला आहे. यापूर्वी 27 नोव्हेंबर ही हरकती घेण्याची अंतिम तारीख होती, ती आता वाढवण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल:हरकती व सूचना : प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आता 3 डिसेंबर 2025 पर्यंत असेल. (पूर्वीची तारीख: 27 नोव्हेंबर). अंतिम मतदार यादी : हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची तारीख आता 10 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. (पूर्वीची तारीख: 5 डिसेंबर). मतदान केंद्रे : मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. (पूर्वीची तारीख: 8 डिसेंबर).केंद्रनिहाय यादी : मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 22 डिसेंबर 2025 असेल. (पूर्वीची तारीख: 12 डिसेंबर). तांत्रिक अडचणींसाठी हेल्पलाईन-मतदार यादी तयार करताना प्रशासकीय पातळीवर कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी आयोगाने खबरदारी घेतली आहे. काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी आयोगाच्या संगणकीकरण कक्षाचे अधिकारी समीर गंदपवार यांच्याशी (022-22886950 / 22012290 ) संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणुकीची तयारी वेगवान-गेल्या काही वर्षांपासून राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. आयोगाच्या ारहरीशल.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर हा संपूर्ण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना आपली नावे तपासण्यासाठी आणि काही दुरुस्ती असल्यास ती करण्यासाठी ही वाढीव मुदत महत्त्वाची ठरणार आहे. 10 डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे मानले जात आहे. या सुधारित कार्यक्रमामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण काहीसा हलका झाला असला तरी, कामाचा वेग वाढवण्याचे आव्हान अधिकार्‍यांसमोर असणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button