शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबध्द
मंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही

* महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनास प्रारंभ
कराड /26 ऑक्टोबर : शिक्षकांना जुनी पेन्शन (निवृत्ती वेतन) योजना आणि टप्पा वाढ अनुदान देण्यासह मुख्याध्यापक व एकूण शिक्षण क्षेत्रासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री आणि सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या कराड येथे आयोजित दोन दिवसीय 64 व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी दिली. अधिवेशनाचे अध्यक्ष मुकेश पाटील (नंदुरबार) तर स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. आमदार महेश शिंदे, आमदार जयंत आसगावकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अधिवेशनास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दूरभाष्य प्रणालीद्वारे संबोधित करत शिक्षक व मुख्याध्यापकांप्रती सद्भावना व्यक्त केली आणि त्यांच्या न्याय भूमिकेला समर्थन असल्याचे सांगितले.
शंभूराज देसाई म्हणाले की, लोकांना दानधर्म करून जेवढं पुण्य मिळत नाही, त्यापेक्षा जास्त पुण्य शिक्षक ज्ञानार्जनाचे काम करून मिळवतात. तरी, त्यांच्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कितीही संकटे किंवा अडचणी आल्या तरी प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचे काम ‘महायुती’चे सरकार करणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कृषी, औद्योगिक क्रांतीसह शिक्षणात अमूलाग्र बदल आवश्यक असल्याचा विचार मांडला आणि रुजवला. या अधिवेशनातून शिक्षण क्षेत्राला चांगली दिशा मिळेल. आमदार महेश शिंदे यांनी सांगितले की, राज्याला दिशा देणारे हे अधिवेशन आहे आणि पूर्वीच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे 64 कला-विद्या आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात, त्यांच्यावर योग्य संस्कार रुजवण्याचे काम सर्वांनी करावे. आमदार जयंत आसगावकर, सुभाष माने, विजय पाटील, तानाजी माने आदींनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. चंद्रकांत पाटील, कौस्तुभ गावडे, मंगेश चिवटे, सचिन नलवडे, बिपीन मोरे यांच्यासह राज्यभरातून शिक्षक आणि मुख्याध्यापकांची अधिवेशनाला मोठी उपस्थिती होती.




