आपल्या बुद्धीवर वसाहतवादी प्रभाव कायम

मुंबई /20 ऑक्टोबर : भारताला समृद्ध आणि दीर्घ अशी ज्ञान परंपरा असली तरी आपण मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीत शिकलो. आपली बुद्धी दुर्दैवाने त्या पद्धतीत घडली. म्हणूनच आपण शरीराने, वंशाने भारतीय असलो तरी मन-चित्ताने अजूनही विदेशी आहोत. आपल्या बुद्धीवर वसाहतवादाचा प्रभाव कायम आहे. त्या प्रभावातून मुक्त झालो तरच आपल्या पारंपरिक ज्ञानाचा अर्थ लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

घाटकोपर येथे ‘आर्य युग विषय कोश’ भाग चारच्या प्रकाशन सोहळ्यात भागवत बोलत होते. मोहन भागवत म्हणाले की, मानवाच्या शाश्वत सुखासाठी भारतीय विचाराकडे जग पाहत आहे, त्यामुळे या ज्ञान परंपरेचा अभिमान आपण मानला पाहिजे. भारताच्या इतिहासात एक युग होऊन गेले, ज्यावेळी आर्यता म्हणजेच सुसंस्कृततेला घेऊन आपण जगभरात गेलो. ‘आर्य’ नावाचा कुठलाही वंश नव्हता; श्रेष्ठ आचार-विचार असणाऱ्यांना त्यावेळी आर्य म्हटले जात असे. अशा या पूर्वजांचा मेक्सिकोपासून सायबेरियापर्यंत संचार होता. ते जिथे कुठे गेले, त्यांनी तेथील राज्ये ताब्यात घेतली नाहीत, ना धर्मांतर केले.

“विश्व एक आहे” हा ऋषी-मुनींनी दिलेला विचार, सद्भावना घेऊन भारतीय संस्कृती, ज्ञान, गणित, आयुर्वेद आणि विविध शास्त्रांनी जगभरात नेला. जग हे जिंकण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी जायचे आहे, हा विचार आपल्या पूर्वजांनी कटाक्षाने पाळला, याकडे भागवत यांनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button