सरन्यायाधिश न्या. भूषण गवई यांचे अमरावतीत आगमन
तीन दिवस मुक्काम, विविध कार्यक्रमामध्ये सहभाग

अमरावती /24 जुलै: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे आज सायंकाळी 4 वाजता बेलोरा, अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी जिल्ह्यातील काही प्रमुख जनप्रतिनिधींसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. न्या. भूषण गवई यांचा 26 जुलैपर्यंत अमरावतीत मुक्कम राहणार आहे. यादरम्यान विविध कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित राहणार आहेत.
उद्या, 25 जुलै रोजी न्या. भूषण गवई यांचे वडिल आणि माजी राज्यपाल व रिपाइं नेते दिवंगत रा. सु. उपाख्य दादासाहेब गवई यांची दहावी पुण्यतिथी असून त्यानिमित्त गवई यांचे मुळ गाव दर्यापूर तालुक्यातील दारापुर येथे अभिवादन समारोह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भूषण गवई अमरावती येथे आले आहेत. यासह अमरावती न्यायालयात ई-लायब्ररीच्या उद्घाटन समारंभात ते सहभागी होतील. दर्यापूर येथे न्याय भवनाचे उद्घाटन न्या. भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. सोबतच एका कौंटुंबिक सोहळ्यातही त्यांची उपस्थिती राहणार आहे.
अमरावती विमानतळावर न्या. भूषण गवई यांचे सायंकाळी आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपस्थित होते. त्यानंतर सरन्यायधीश भूषण गवई नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.




