भाजप नेते प्रवीण दरेकर अडकले लिफ्टमध्ये

दरवाजा तोडून केली सुटका

-मोठा अनर्थ टळला
मुंबई / 20 जुलै : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर हे आज वसई येथे लिफ्टमध्ये अडकले. वसई पश्चिम येथील कौल हेरिटेज सिटी येथील इमारत स्वयंपुनर्विकास शिबिरासाठी ते आले होते. यावेळी दरेकर यांच्यासोबत लिफ्टमध्ये गर्दी झाल्यामुळे बिघाड झाला. जवळपास दहा मिनिटे दरेकरांसह 17 जण लिफ्टमध्ये अडकून होते. अखेर लिफ्टचा दरवाजा तोडून दरेकरांना बाहेर काढण्यात आले. लिफ्टमध्ये अडकलेले सर्वजण आता सुखरूप आहेत.
भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर हे आज वसई येथील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे, नालासोपार्‍याचे आमदार राजन नाईक देखील होते. लिफ्टमध्ये अडकलेल्यांमध्ये या दोन्ही आमदारांचाही समावेश होता. वसई येथील कौल हेरिटेज सिटी येथील लिफ्टची क्षमता 10 जणांची होती. मात्र शिबिरासाठी आलेल्या मान्यवरांसोबत 17 जण या लिफ्टमध्ये होते.
क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्यामुळे लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि सर्वकजण लिफ्टमध्ये अडकले. यामुळे त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशी चिंताग्रस्त झाले. तातडीने मदतीसाठी धावाधाव करण्यात आली. स्थानिक आणि सुरक्षा रक्षकांनी लोखंडी रॉडच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्यात यश आले आणि सर्वांची सुखरुप सुटका झाली. यामध्ये जवळपास 10 मिनिटे गेली. साधारण 10 मिनिटे आमदार प्रवीण दरेकर, स्नेहा दुबे, राजन नाईक हे लिफ्टमध्ये अडकून होते.

संबंधित बातम्या

Back to top button